वसई: सध्या राज्यभर गणेशोत्सव सण साजरा करायची धुमधाम असल्यामुळे प्रशासन आणि पोलिसांची अतिदक्ष राहण्याची तयारी सुरु आहे. त्यातच लोकप्रतिनिधी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना करतात. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या दृष्टीने सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची मध्यरात्री प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या दुरुस्ती, पॅचवर्क, पेवर ब्लॉकच्या कमांमध्ये दिसून आलेल्या निकृष्ट दर्जा, गुणवत्ता तसेच कामाची गतीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. शिवाय नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कामे तातडीने, दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. आमदार दुबे यांनी वसई पूर्वेच्या अग्रवाल नाका परिसर, स्टार सिटी जूचंद्र, वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व तसेच वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन, वसंत नगरी गेट, एव्हरशाईन वसई पूर्व या प्रमुख मार्गांची पाहणी केली.
दुसरीकडे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामांची पाहणीदरम्यान आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसईत पहाटेपर्यंत सुरु असलेल्या नाईट लाईफच्या धिंगाण्याचा पर्दाफाश केला. वसईतील दत्तानी मॉल मधे ‘विंग्स ऑन फायर’ आणि ‘पंखा फास्ट’ या बारने पोलिसांच्या नाकावर टिच्चून, कायदा मोडून बार उशिरापर्यंत सुरू ठेवल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. जिथे पब आणि बारला मर्यादित वेळेपर्यंत परवानगी आहे. त्या बारने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आमदारांनी लगेच गुन्हा दाखल करायला लावून, पोलिसांचे लक्ष कुठे असते? अशा गोष्टी कशा तुमच्यापासून दुर्लक्षित होतात असा सवाल ही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला.
तिथल्या नागरिकांनी येथे मोठ्या आवाजात डिजे वाजवला जात असल्याने वारंवार सांगूनही वसई पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने सांगितले तेव्हा आमदार दुबे यांनी संताप व्यक्त केला. तर, मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून चुकीचे वर्तन केल्याचे आढळून आले, त्यानंतर आमदार स्नेहा दुबे यांनी परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील चांगलेच फैलावर धरले. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आणि कडक शब्दात त्यांना परिसरात लक्ष ठेवायला लावले.
– प्रीती हिंगणे (लेखिका)












