तिरुवनंतपुरम : काही लोकांचं नशीब असं असतं की लॉटरी जिंकून ते रातोरात करोडपती होतात. अशाच एका व्यक्तीची आणि लॉटरी एजन्सी चालवणाऱ्या व्यक्तीची कहाणी सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्या लॉटरी विजेत्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, केरळ तिरुवनंतपुरम बंपर लॉटरीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक दिवस उलटून गेला. तरीही 25 कोटी रुपयांच्या पहिला बक्षीस विजेता व्यक्ती अद्याप गुलदस्त्यात आहे. त्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळं हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे.
तिकीट कोणी विकत घेतलं?
या विजेत्याचे तिकीट (TH 577825) एर्नाकुलमच्या नेत्तूर येथील लॉटरी एजंट एमटी लतीश यांनी विकलं होतं, याची माहिती समोर आली आहे. मात्र, या विजेत्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तो विजेता व्यक्ती नेत्तूर या भागातील असल्याचं म्हटलं जात आहे. कथितरित्या हे तिकीट सोडतीच्या एक दिवस आधी विकण्यात आलं होतं. यासंदर्भात लतीश यांनी म्हटलं आहे की, त्यांना ते लॉटरीचं तिकीट कोणी विकत घेतलं? हे माहीत नाही. आपल्या परिसरातीलच व्यक्तीनं हे लॉटरीचं तिकीट घेतलं असावं, असा अंदाज लतीश यांनी व्यक्त केला आहे.
केरळमध्ये चर्चेचा विषय
लॉटरी एजन्सी चालवणारा लतीश संपूर्ण केरळमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 2025 च्या तिरुवोनम बंपर (BR-92) मध्ये 25 कोटी रुपयांचे विजयी तिकीट विकल्याबद्दल लतीश हे खूप आनंदी आहेत. फक्त तीन महिन्यांत विजयी तिकीट विकण्याचं दुसऱ्यांदा लतीश यांनी यश मिळालं आहे.
लॉटरी एजन्सी उत्पन्नाचा मुख्य स्रोत
लतीश यांनी विकलेल्या तिकिटाला इतकं मोठं बक्षीस मिळेल, अशी त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. मात्र, त्यांनी नेहमीच प्रत्येक तिकीट आशा आणि सकारात्मकतेनं विकलं आहे. काही वर्षांपूर्वी लतीश हे नारळ तेलाचा घाऊक व्यापार करत होते. मात्र, ज्यावेळी हा नारळ तेलाचा त्यांचा व्यवसाय मंदावला, त्यावेळी त्यांनी एक नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपूर्वी त्यांनी लॉटरीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. आज ते कमी प्रमाणात नारळ तेल विकतात, परंतु प्रामुख्यानं त्यांच्या लॉटरीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करतात, जो त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. लतीश हे भागवती लॉटरी एजन्सी अंतर्गत काम करतात. त्यांनी या एजन्सीद्वारे 800 तिकिटं आणि एर्नाकुलम कार्यालयातून 300 तिकिटं खरेदी केली. विशेष म्हणजे, विजयी तिकीट भागवती एजन्सीचं होतं. त्याच एजन्सीचं ज्यावर त्यांनी तीन महिन्यांपूर्वी एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेले तिकीट विकलं होतं. त्यामुळं सुरुवातीच्या यशामुळं लतीश यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.