नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात सुमारे 63 वर्षे सेवा केल्यानंतर मिग-21 लढाऊ विमान शुक्रवारी निवृत्त झालं. चंदीगडमध्ये मिग-21 चा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, सीओएएस जनरल उपेंद्र द्विवेदी, सीएनएस अॅडमिरल दिनेश आणि एअर चीफ मार्शल एपी सिंग हे देखील उपस्थित होते.
बजावली मोलाची कामगिरी : भारतीय हवाई दलाचा भक्कम कणा मिग-21 लढाऊ विमान तब्बल सहा दशकांच्या उत्कृष्ट सेवेनंतर 26 सप्टेंबरला सेवानिवृत्त झालं. तज्ज्ञांच्या नजरेतून मिग-21 हे भारताचं एक उत्तम लढाऊ विमान होतं. या विमानानं फक्त वेळोवेळी पाकिस्तानी हवाई दलाचं पितळ उघडं पाडलं नाही, तर भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना जगातील सर्वोत्तम वैमानिक बनण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं.
63 वर्षे दिली सेवा : निवृत्त झालेल्या मिग-21 विमानांना वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. सॅल्यूटपूर्वी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी मिग-21 विमानांना त्यांच्या शेवटच्या उड्डाणासाठी नेले. मिग-21 विमानं 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली होती आणि 63 वर्षांच्या सेवेनंतर ही विमानं निवृत्त होत आहेत.
महत्त्वाच्या युद्धात बजावली मोलाची कामगिरी : निरोप समारंभाला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “दीर्घकाळात मिग-21 नं असंख्य शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचं योगदान केवळ एका घटनेपुरतं किंवा एकाच युद्धापुरतं मर्यादित नाही. 1971 च्या युद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत, बालाकोट हवाई हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मिग-21 नं आपल्या सशस्त्र दलांना प्रचंड ताकद दिली नाही. मिग-21 हे केवळ एक विमान नाही, तर ते भारत-रशिया संबंधांचं प्रतीक आहे.”