शारदीय नवरात्रीची समाप्ती दसरा साजरा करून केली जाते. दसरा हा एक हिंदू सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हा सण प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून तसेच देवी दुर्गेच्या महिषासुरावरील विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच याला विजयादशमी सुद्धा म्हटले जाते. हा सण अश्विन शुद्ध दशमी या तिथीला साजरा केला जातो आणि याने नवरात्रीच्या उत्सवाची समाप्ती केली जाते.
दसरा साजरा करण्याची कारणे :
दसरा साजरा करणे म्हणजे विजयोत्सव साजरा करणे, असे मानले जाते. या दिवशी वाईट शक्तींचा नाश करून देवतांनी विजय मिळवला, म्हणून विजयादशमी आणि दसरा साजरा करण्याची पद्धत रूढ आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा रावणावर विजय:
प्रभू रामचंद्रांनी सीतेचे हरण केल्यामुळे रावणाचा वध करून सीता मातेची सुटका केली. त्यामुळे या विजयाचे स्मरण म्हणून दसरा साजरा केला जातो.
देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय आणि शारदीय नवरात्रीचा समारोप :
दुर्गा देवीने नऊ रात्र युद्ध करून दहाव्या दिवशी महिषासुर राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले. म्हणून नवरात्रीचा शेवट या विजयाचा उत्सव म्हणून देखील दसरा साजरा होतो.
दसरा साजरा करण्याच्या पद्धत
रावणाचे दहन:
या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचे प्रतीक आहे.
देवीची पूजा:
नवरात्रौत्सवात नऊ दिवस दुर्गा देवीच्या रूपांची पूजा केली जाते आणि घरात संपत्ती व समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते. शारदीय नवरात्र सुरु होताना केलेल्या घटस्थापनेची आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन या दिवशी केले जाते.
शस्त्रांची पूजा:
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. तसेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करून ‘सोने’ देण्याचा एक पारंपरिक विधी असतो. यासोबतच वही किंवा पाटीवर सरस्वतीची प्रतिमा लेखातून सरस्वती मातेची देखील पूजा करण्याची प्रथा आहे.
दसरा किंवा विजयादशमी साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व
दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. हा सण धर्माचे रक्षण आणि नैतिकतेचा विजय दर्शवतो. तसेच या दिवशी शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. वर्षभरातील अनेक शुभ दिवसांपैकी दसरा देखील एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण शुभकार्याची सुरुवात करतात. या दिवशी सोने, गाडीची देखील खरेदी केली जाते. तसेच या दिवशी रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा नाश केला जातो, असे मानले जाते.
विजया दशमीला आपट्याची पाने का वाटतात?
विजयादशमी किंवा दसऱ्याला आपट्याची पाने “सोने” म्हणून वाटण्याची परंपरा आहे. याबद्दल एक अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे अशी, की “भगवान श्री रामाचें वंशज “रघु” यांनी एकदा यांनी विश्वजीत यज्ञ केला व आपल्या जवळील सर्व धन त्यांनी दान केले. एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरतंतू यांचा शिष्य “कौस्त्य” आला. त्याने राजाकडे भिक्षा मागितली. तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता, आणि विद्या शिकण्यासाठी बडोच नगरीत राहणाऱ्या “वरतंतू” कडे राहण्यास होता. सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या गुरूला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी, अशी विनंती केली. तेव्हा त्याचे गुरु म्हणाले,’मी तुला कुठल्याही प्रलोभनाने विद्या शिकविली नाही.’ असे वरतंतूने त्याला स्पष्टपाने सांगितले, परंतु तरीही कौस्त्याने त्यांच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला. मग त्यांनी त्याच्याकडे “14 कोटी सुवर्ण मुद्रा” गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या. आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौस्त्या राजा रघुकडे सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी आला. परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झालेला होता. पण दरामध्ये आलेला अतिथी रिकामा जाऊ नये, म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले. ही बातमी इंद्रदेवाला समजताच त्यांनी राजा रघु यांच्या अयोध्या नगरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. कौस्त्याने फक्त आपल्या गुरूला देण्याइतक्याच १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरूला गुरुदक्षिणा दिली. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी. म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सुवर्ण म्हणजेच सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे.
सीमोल्लंघन म्हणजे काय?
आपण नेहमी ऐकतो, दसऱ्याला सामोल्लंघन केले जाते. पण सीमोल्लंघन म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना असतो. तर सीमोल्लंघन म्हणजे,”पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करत होते. महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची प्रथा होती. याशिवाय, अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात”, असं म्हटलं जात. त्यामुळेच, दसऱ्याला अनेक नवीन कार्यांची सुरुवात केली जाते, सोने खरेदी केली जाते,वाहने खरेदी केली जातात.