नवदुर्गांपैकी चौथी देवी म्हणजे कुष्मांडा देवी. कुष्मांडा देवीमुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाल्याची कथा प्रचलित आहे. देवी कुष्मांडामुळे सृष्टीला ऊर्जा प्रदान केली जाते, असं म्हटलं जात. मातेला आठ हात असून त्यामध्ये कमंडलू, धनुष्य-बाण, कमळ, शंख, चक्र, गदा, जपमाळ आणि अमृताचा कलश आहे, त्यामुळे त्यांना ‘अष्टभुजा देवी’ असेही म्हणतात. देवीचे वाहन सिंह असून कुष्मांडा देवीच्या उपासनेने भक्तांचे रोग, दुःख दूर होऊन आयुष्य, कीर्ती आणि आरोग्य वाढते.
“कुष्मांडा” नावाचा अर्थ:
कुष्मांडा या शब्दाचे अर्थ ‘कू’ म्हणजे थोडे, ‘उष्मा’ म्हणजे ऊर्जा आणि ‘अंडा’ म्हणजे ब्रह्मांडीय गोळा. याचा अर्थ असा कि, थोड्याश्या ऊर्जेने ब्रम्हांडाची निर्मिती करणारी आदिशक्ती म्हणजे माता कुष्मांडा.
देवीच्या अवताराची कथा :
कुष्मांडा देवीच्या अवताराची कथा सांगताना असे सांगितले जाते कि,”सृष्टीच्या निर्मितीच्या आधी ना पृथ्वी होती ना सूर्य,होता तो फक्त अंधकार. त्याच अंधकारातून कुष्मांडा देवीची निर्मिती झाली आणि तिच्या तेजातून सूर्य देवाचा जन्म झाला आणि सृष्टीची निर्मिती झाली. त्यामुळे देवी कुष्मांडाला सृष्टीची निर्माणकर्ती असं म्हटलं जात. देवीचा निवास सूर्यमंडळात असून त्यांचे शरीर सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे.
पूजेचे महत्व:
कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे मन शांत आणि जीवन समृद्ध होते. देवीच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्य वाढते. तसेच रोग आणि दुःख दूर होतात.
पूजन विधी:
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. यावेळी देवीला पिवळी फुले व पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण केली जाते. प्रामाणिक अंतःकरणाने केलेली भक्ती देवीला प्रसन्न करते. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे जीवनात नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धी येते.