नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून अत्यंत उत्साहात आणि आनंदात नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. भारतातील अनेक भागात विविध प्रकारे देवीच्या वेगवेगळ्या रुपाची पूजा केली जाते. घटस्थापना हि सार्वजनिक मंडळांबरोबरच घरातही केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केलं जातं. मात्र,यंदा नवरात्री दहा दिवसांची असणार आहे. कारण, यंदाच्या वर्षी एक तिथी दोन वेळेस आल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची झाली आहे. दहा दिवसांची नवरात्री झाल्यामुळे अष्टमी आणि नववीबाबत अनेकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. याबाबतच माहिती या लेखातून पाहा.
नेमकं अष्टमी आणि नवमी कधी आहे?
यंदा नवरात्रीतला आठवा दिवस जरी सोमवार, 29 सप्टेंबर रोजी असला तर अष्ठमीची तिथी मंगळवारी 30 सप्टेंबर, रोजी असणार आहे. कारण, पंचागानुसार, सोमवार 29 सप्टेंबर, रोजी सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी अष्टमी तिथीचा आरंभ होणार असून 30 तारखेला सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी समाप्ती होईल.
तर बुधवारी, 1 ऑक्टोबर, रोजी सायंकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी नवमी तिथीची समाप्ती होईल. यानुसार, 30 सप्टेंबरला अष्टमी आणि 1 ऑक्टोबरला नवमी असेल. तर गुरुवार 2 ऑक्टोबर, रोजी दसरा असून यंदाच्या नवरात्र उत्सवाची सांगता होईल.
महालक्ष्मी पूजन
सप्तमीला कडाकणी किंवा फुलोरा लावला जातो. सप्तमीला नऊ पुऱ्या, ९ साटोऱ्या, ९ करंज्या असा फुलोरा देवीला अर्पण केला जातो. राज्यातील प्रत्येक ठिकाणी फुलोऱ्याची पद्धत वेगवेगळी असते असून काही ठिकाणी देवीच्या अगदी वरच्या बाजूला फुलोरा लावला जातो, तर काहीजण यासाठी स्टिलच्या स्टँडचा उपयोग करतात.
चक्रपूजा कधी करतात?
नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला चक्रपूजा केली जाते. चक्रपूजा संध्याकाळी मांडण्याची प्रथा आहे. खरं तर, ही युद्धामधील एक व्यूहरचना असल्याचं मानलं जातं. चक्रपुजा म्हणजे देवीचा असुरांशी झालेलं युद्ध. विशेषतः खान्देश आणि विदर्भात ही पूजा करण्याची पद्धत असून चक्रपूजा ही कुलदैवीची पूजा असते. चक्रपूजेदरम्यान, जमिनीवर चक्राकार रांगोळी काढली जाते. काही ठिकाी त्रिकोणी तर काहीजण गोलाकार रांगोळी काढून ही पूजा केली जाते.
कन्यापूजन कधी करावं?
नवरात्रौत्सवातील नऊ दिवसांपैकी कधीही कन्या पूजन करता येते. परंतू प्रामुख्याने अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन केले जाते. यामध्ये दोन ते दहा वर्षांच्या मुलींचं कन्यापूजन केलं जाते. यावेळी, घरी आलेल्या या कन्या म्हणजे देवीचं रुप मानलं जातं. या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या पदार्थांमध्ये अधिकांश खीर पुरी, शिरा करण्याची पद्धत आहे. वाणाच्या रुपात मुलींना भेटवस्तूही दिल्या जातात. याशिवाय, त्यांना गजरा, दक्षिणाही दिली जाते. यावेळी, नऊ कुमारींकांना जेवू घालणं शक्य नसल्यास एक कुमारीकेचं पूजन केलं तरी चालतं. यासोबत काही ठिकाणी, भैरव म्हणून एका मुलाचेही पुजन केले जाते आणि त्यालाही गोडाधोडाचं जेवण दिल जात.