अबुधाबी : अफगाणिस्तान क्रिकेट संघानं पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशला 3-0 नं क्लीन स्वीप केलं. यासह, अफगाणिस्तान संघानं सलग पाचवी वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी संघानं आयर्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती.
200 धावांनी विक्रमी विजय :
हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं 14 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला 200 धावांनी पराभूत करुन इतिहास रचला. हा अफगाणिस्तानचा वनडे क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. अशाप्रकारे अफगाणिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेचा विक्रम मोडला. यापूर्वी, 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं आयर्लंडला 174 धावांनी पराभूत केलं होतं. या मैदानावर 56 वनडे सामने खेळले गेले आहेत, परंतु अफगाणिस्ताननं बांगलादेशला 200 धावांनी पराभूत करुन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
अबुधाबीमध्ये धावांनी सर्वात मोठा विजय :
अफगाणिस्तान : 200 धावा विरुद्ध बांगलादेश (2025)
दक्षिण आफ्रिका : 174 धावा विरुद्ध आयर्लंड (2024)
स्कॉटलंड : 150 धावा विरुद्ध अफगाणिस्तान (2015)
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐇𝐈𝐓𝐄𝐖𝐀𝐒𝐇𝐄𝐃 𝐁𝐀𝐍𝐆𝐋𝐀𝐃𝐄𝐒𝐇 𝐈𝐍 𝐎𝐃𝐈 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒! 🙌🙌
AfghanAtalan have put on a terrific all-round performance to beat Bangladesh by 200 runs and complete a 3-0 whitewash in the Etisalat Cup ODI series. 👏#AfghanAtalan |… pic.twitter.com/hGGC2jshal
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 14, 2025
अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी :
अफगाणिस्ताननं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कठीण खेळपट्टीवर 293 धावांचा भक्कम आकडा गाठला. इब्राहिम झद्राननं संघासाठी शानदार फलंदाजी केली, 111 चेंडूत त्यानं 95 धावा केल्या, तर मोहम्मद नबीनं शेवटच्या षटकांमध्ये धमाकेदार खेळी केली. नबीनं फक्त 37 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश पूर्णपणे डगमगला आणि फक्त 93 धावांवर कोसळला. संपूर्ण संघ 28व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर सैफ हसन हा एकमेव फलंदाज होता जो 43 धावा करत क्रिजवर टिकून राहिला.
हे हि वाचा : महिला विश्वचषकातील श्रीलंका-न्यूझीलंड सामना रद्द; भारताला फायदा
टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला :
अफगाणिस्तानकडून बिलाल सामीनं घातक गोलंदाजी केली, त्यानं पाच विकेट घेतल्या, तर रशीद खाननंही तीन विकेट घेतल्या. इब्राहिम झद्रानला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानं तीन सामन्यांमध्ये 213 धावा केल्या. या विजयासह अफगाणिस्ताननं केवळ मालिका 3-0 नं जिंकली नाही तर बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील त्यांच्या अपमानास्पद पराभवाचा बदलाही घेतला. बांगलादेशनं टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता.