दुबई : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला 5 विकेट्सनं हरवून विक्रमी नवव्यांदा विजेतेपद पटकावलं. या विजयामुळं भारतीय संघाला मोठी रक्कम मिळाली, तसंच विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू श्रीमंत झाले आहेत. मात्र अंतिम सामना हरल्यानंतरही, आशियाई क्रिकेट परिषदेनं पाकिस्तानवर पैशांचा वर्षाव केला.
भारतीय संघानं बक्षीस रक्कम स्वीकारण्यास दिला नकार
अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघानं ट्रॉफी पदकं आणि बक्षीस रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. परंतु भारतीय संघाला विजेते म्हणून 300000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ₹2.6 कोटी) मिळाले असते, जे 2023 च्या आशिया कपच्या तुलनेत जवळजवळ 50 टक्के जास्त आहे. पुरस्कार सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. तिलक वर्मानं अंतिम सामन्यात नाबाद 69 धावा केल्या, तर अष्टपैलू शिवम दुबेनं 33 धावा केल्या. गोलंदाजीत त्यानं तीन षटकांत फक्त 23 धावा दिल्या. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत, त्यानं गोलंदाजी जबाबदारीही घेतली. कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांनाही मोठे पुरस्कार मिळाले. तर उपविजेत्या पाकिस्तानलाही 75000 अमेरिकन डॉलर म्हणजे अंदाजे 66.50 लाख रुपये मिळाले.
आशिया कप 2025 पुरस्कार यादी
विजेता संघ – भारत (ट्रॉफी आणि बक्षीस रक्कम स्वीकारण्यास नकार दिला)
उपविजेता संघ – पाकिस्तान, पदक आणि 75000 अमेरिकन डॉलर (अंदाजे 66.50 लाख भारतीय रुपये)
सामनावीर – तिलक वर्मा, 5000 अमेरिकन डॉलर (अंदाजे 4.43 लाख रुपये) आणि एक ट्रॉफी
स्पर्धेतील मौल्यवान खेळाडू – कुलदीप यादव, 15000 अमेरिकन डॉलर (अंदाजे 13.30 लाख भारतीय रुपये)
मालिकावीर खेळाडू – अभिषेक शर्मा, 15000 अमेरिकन डॉलर (अंदाजे 13.30 लाख भारतीय रुपये) आणि एक एसयूव्ही कार, एक ट्रॉफी