सिडनी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात आणि टी-20 मालिकेसाठी संघात अनेक बदल जाहीर केले आहेत. न्यू साउथ वेल्स (एनएसडब्ल्यू) चा अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्सचा सिडनी इथं होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि बेन द्वारशुइस यांचे फिटनेस रिपोर्ट क्लिअर झाल्यानंतर भारताविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेच्या शेवटच्या टप्प्यासाठी परततील. याव्यतिरिक्त, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा वेगवान युवा गोलंदाज माहली बियर्डमनलाही टी-20 संघात बोलावण्यात आलं आहे.
20 वर्षीय वेगवान गेलंदाजाला संधी :
20 वर्षीय माहली बियर्डमनची शेवटच्या तीन टी-20 सामन्यांसाठी निवड झाली आहे. 19 वर्षांखालील या वेगवान गोलंदाजानं अलीकडेच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. बिग बॅश लीगच्या दुसऱ्या सामन्यात त्यानं तीन विकेट घेतल्या आणि फक्त चार लिस्ट ए सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. तसंच जॅक एडवर्ड्सची निवड अलिकडच्या भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया ए संघासाठी त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर झाली. लखनऊमध्ये झालेल्या चार दिवसांच्या सामन्यात त्यानं 88 धावा केल्या आणि कानपूरमध्ये झालेल्या वनडे मालिकेत 56 धावांत 4 बळी घेतले आणि 89 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल :
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 24 ऑक्टोबर रोजी संघातील बदल जाहीर केले. 28 ऑक्टोबरपासून गॅबा इथं सुरु होणाऱ्या शेफील्ड शिल्ड सामन्यासाठी क्वीन्सलँड संघात सामील होण्यासाठी तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मार्नस लाबुशेनला सोडण्यात आलं आहे. जोश हेझलवुड आणि शॉन अॅबॉट भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेच्या शेवटी खेळणार नाहीत. 10 नोव्हेंबरपासून एससीजी इथं सुरु होणाऱ्या शिल्ड सामन्यात दोन्ही खेळाडू एनएसडब्ल्यूकडून खेळतील. हेझलवुड फक्त पहिले दोन टी-20 सामने खेळेल, तर अॅबॉट तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर (होबार्ट) संघातून माघार घेईल.
कुहनेमनला पुन्हा संघात स्थान :
पर्थमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात खेळणारा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुन्नेमनला सिडनी वनडे सामन्यासाठी संघात परत बोलावण्यात आलं आहे. यष्टीरक्षक जोश फिलिपलाही टी-20 संघात समाविष्ट करण्यात आले आहे, कारण जोश इंगलिस अद्याप पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे ग्लेन मॅक्सवेल पहिल्या दोन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडला होता, परंतु आता तो शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघात परतेल. पायाच्या दुखापतीमुळं वनडे मालिकेतून आणि पहिल्या तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडलेल्या बेन द्वारशुइसचा क्वीन्सलँडमधील चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, जॅक एडवर्ड्स, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू कुनमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ :
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (पहिले तीन सामने), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (शेवटचे तीन सामने), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (शेवटचे दोन सामने), नॅथन एलिस, जोश हेझलवूड (पहिले दोन सामने), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुनमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.












