नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 140 धावांनी जिंकला होता. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. परिणामी दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं 90 षटकांत 2 बाद 318 धावा केल्या. दिवसअखेर संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल 173 आणि कर्णधार शुभमन गिल 20 धावांवर नाबाद आहेत.
भारताची मजबूत फलंदाजी :
पहिल्या दिवशी भारतानं 90 षटकांत 2 बाद 318 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल 173 धावांसह आणि शुभमन गिल 20 धावांसह खेळत आहेत. साई सुदर्शन 87 धावा करुन बाद झाला आणि केएल राहुल 38 धावा करुन बाद झाला. दोन्ही विकेट जोमेल वॉरिकनने घेतल्या. याशिवाय वेस्ट इंडिजचे 5 गोलंदाजांना विकेट मिळाली नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदाच टॉस जिंकला. याआधी त्यांनी 6 वेळा टॉस गमावला होता. भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. वेस्ट इंडिजनं प्लेइंग 11 मध्ये 2 बदल केले. ब्रँडन किंग आणि जोहान लिन यांच्या जागी अँडरसन फिलिप आणि टेविन इमलाचला संधी मिळाली.
दोन्ही देशांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा :
भारत आणि वेस्ट इंडिजनं आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात वेस्ट इंडिजनं वरचढ कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजनं 30 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियानं 23 सामने जिंकले आहेत. जरी वेस्ट इंडिजचा हेड-टू-हेड रेकॉर्ड वर्चस्व गाजवत असला तरी वेस्ट इंडिजनं भारतात शेवटचा विजय डिसेंबर 1994 मध्ये मिळवला होता. तसंच 2002 नंतर कॅरोबियन संघाला भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
टीम इंडियाची दिल्लीच्या मैदानावर कामगिरी कशी :
भारतीय संघानं दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर एकूण 35 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 14 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. शिवाय या मैदानावर 15 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघानं 1987 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावला होता, जेव्हा दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पाच विकेटनं पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून गेल्या 38 वर्षांत टीम इंडियानं या मैदानावर एकही कसोटी सामना गमावलेला नाही.