गुवाहाटी : आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा आठवा सामना 7 सप्टेंबर रोजी इंग्लंड महिला संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 178 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं 4 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयामुळं गुणतालिकेत मोठे बदल झाले असून टीम इंडियालाही मोठा धक्का बसला.
बांगलादेश महिला फलंदाजांची निराशजनक कामगिरी :
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश महिला संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रुबिया हैदरला लॉरेन बेलनं 4 धावांवर बाद केलं. त्यानंतर कर्णधार निगार सुलतानाला लिन्सी स्मिथनं बाद केलं आणि ती तिचं खातंही उघडू शकली नाही. त्यानंतर शर्मीन अख्तर आणि शोभना मोस्टारीनं डाव सावरला. दोघींनी 60 चेंडूत 34 धावांची संथ भागीदारी केली. शर्मीन 52 चेंडूत 30 धावांवर बाद झाली. या सामन्यात बांगलादेशकडून शोभना मोस्टारीनं सर्वाधिक धावा केल्या, तिनं 108 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावा केल्या. तिच्याशिवाय, राबेया खाननं 27 चेंडूत 43 धावा केल्या, ज्यामध्ये तिनं 6 चौकार आणि 1 षटकार मारला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोननं सर्वाधिक 3 बळी घेतले. चार्ली डीन, अॅलिस कॅप्सी आणि लिन्सी स्मिथ यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर लॉरेन बेलनं एक बळी घेतला.
Heather Knight’s resolute knock guides England to their second #CWC25 win on a trot :raised_hands:#ENGvBAN :memo:: https://t.co/ktCq5FgHrR pic.twitter.com/qMfKYPKNjf
— ICC (@ICC) October 7, 2025
इंग्लंडकडून हीथर नाईटची निर्णायक खेळी :
179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. संघानं 29 धावांत 2 बळी गमावले. एमी जोन्स 1 आणि टॅमी ब्यूमोंट 13 धावांवर बाद झाली. कर्णधार नताली सायव्हर-ब्रंटनं हीथर नाईटसह डाव सावरला. सायव्हर-ब्रंट 41 चेंडूंत 32 धावांवर बाद झाली. सोफिया डंकली तिचं खातंही उघडू शकली नाही आणि एम्मा लंब 1 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. अॅलिस कॅप्सी देखील 20 धावा करुन बाद झाली. इंग्लंड सतत विकेट गमावत असताना, हीथर नाईट शेवटपर्यंत क्रीजवर राहिली आणि संघाला विजयाकडे घेऊन गेली. नाईट 111 चेंडूत 79 धावा करत नाबाद राहिली. तिच्या या निर्णायक खेळीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. चार्ली डीननंही नाबाद 27 धावा केल्या.
टीम इंडियाला मोठा धक्का :
इंग्लंडच्या विजयानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोनपैकी दोन सामने जिंकून भारतानं 4 गुण मिळवले आहेत. भारताचा नेट रन रेट +1.515 आहे. ऑस्ट्रेलिया पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाचे 3 गुण आहेत. दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका महिला क्रिकेट संघ सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड सातव्या स्थानावर आहे. पाकिस्तान तळाशी आहे, दोन्ही संघांनी टेबलमध्ये अद्याप आपलं खातं उघडलेलं नाही.