महाराष्ट्रात वेगवेगळ्या खेळांना चालना मिळावी म्हणून राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असून खेळाडूंना सर्व सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मैदाने मिळावीत यासाठी राज्याचे क्रीडा मंत्रालय सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असते. याच धर्तीवर महाराष्ट्राने आता फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेसिंगमध्येही पाऊल टाकले असून मिळालेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात पहिल्यांद्याच नवी मुंबईत फॉर्म्यूला स्ट्रीट रेसिंग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिडेट आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून या करारानुसार, येत्या डिसेंबर महिन्यात इंडियन रेसिंग फेस्टिव्हलअंतर्गत येणाऱ्या फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेसचा ग्रँड फिनाले नवी मुंबईत होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आता मुंबईतल्या पहिल्यावहिल्या एआयए-ग्रेड स्ट्रीट सर्किटची सुरुवात होणार आहे. या रेसिंगचा ट्रॅक एकूण 3.753 किमीचा असेल, तसेच या ट्रॅकवर एकूण 13 वळण असतील. तर पाम बीच रोड, नेरुळ तलाव असा या ट्रॅकचा मार्ग असेल. या स्पर्धेच्या रूपाने, भारतातील मोटरस्पोर्ट क्षेत्राच्या विकासासाठी हा फार मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असल्याचे बोलले जात आहे.
या यशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कि मुंबई स्ट्रीट रेस महाराष्ट्राच्या मोटारस्पोर्ट प्रवासातील मैलाचा दगड असून या करारामुळे अनके तरुण रेसर्सना प्रेरणा मिळेल. तसेच या प्रयोगामुळे नव्या रोजगाराचीही निर्मिती होईल. तसेच पर्यटनालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच, या करारानंतर आरपीपीएलचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले,”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नवी मुंबई महापालिकेचा पाठिंबा यांच्या मदतीने एक अतुलनीय अशी मोटार रेसिंग आयोजित करण्यात येणार आहे”, असे मत रेड्डी यांनी व्यक्त केले. याआधी हैदराबाद, चेन्नई, कोईंबतुर, गोवा इथे रेसिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता देशात मोटरस्पोर्ट वृद्धींगत होण्यासाठी मुंबईत ही रेसिंग आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेसिंगकडे संपूर्ण भारताचे, जगाचे लक्ष असणार आहे.