मुंबई : भारतीय क्रिकेटची प्रमुख घरगुती प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा 2025-26 म्हणजेच 91वा हंगाम आज बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी सुरु होत आहे. या स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी होतील, ज्यात एलिट डिव्हिजनमध्ये 32 संघ आणि प्लेट ग्रुपमध्ये सहा संघ असतील. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण 19 सामने खेळवले जातील. या हंगामात दोन भागांमध्ये 138 सामने होतील. गतविजेता विदर्भ आपला हंगाम नागालँडविरुद्ध खेळेल, तर मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरशी होईल आणि गेल्या हंगामातील उपविजेता केरळ संघ महाराष्ट्राशी सामना करेल.
दिग्गजांच्या कामगिरीकडे असेल लक्ष :
या रणजी ट्रॉफी हंगामात इशान किशन, रजत पाटीदार, अभिमन्यू ईश्वरन आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केलं जाईल. तसंच हर्ष दुबे, उमरान मलिक, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी सारख्या गोलंदाजांवरही मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातील. यापूर्वी मुंबईकडून घरगुती क्रिकेट खेळलेला पृथ्वी शॉ या हंगामात महाराष्ट्राकडून खेळेल. दरम्यान, करुण नायर या हंगामात त्याची माजी होम टीम कर्नाटककडून खेळेल. गेल्या हंगामात विदर्भाच्या विजयात नायरनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हे हि वाचा : गिलच्या नेतृत्वात भारतानं जिंकली पहिली मालिका; वेस्ट इंडिजचा 2-0 नं सफाया
नव्या नेतृत्वात खेळणार मुंबई :
विक्रमी 42 वेळा रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ या हंगामात नवीन कर्णधार शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गेल्या हंगामात उपांत्य फेरीत गतविजेत्या आणि इराणी कप विजेत्या विदर्भाकडून पराभव पत्करल्यानंतर, मुंबई या हंगामात आपलं वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी उत्सुक असेल. माजी कर्णधार अजिंक्य रहाणे या हंगामात मुंबईच्या संघाचा भाग आहे. तर 20 वर्षांत पहिल्यांदाच पुजारा या स्पर्धेत खेळणार नाही. 42 वेळा विजेता मुंबई पुन्हा एकदा जेतेपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेची सुरुवात करेल. गतविजेता विदर्भ देखील सहजपणे जेतेपद गमावू इच्छित नाही. शिवाय केरळ, सौराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक सारखे संघ त्यांचं वैभव परत मिळविण्यासाठी किंवा एक नवीन अध्याय लिहिण्यास उत्सुक असतील.
All set for the Ranji Trophy 2025-26 opener! ⚡
Maharashtra lock horns with Kerala — a test of skill, grit, and team spirit.Date: 15th–18th Oct
Time: 9:30 AM
Venue: Sports Hub International Cricket stadium, Trivandrum
LIVE on JioHotstar & Star Sports Khel #mca#mcacricket… pic.twitter.com/jSXzqRi7XY— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) October 15, 2025
तरुण खेळाडू उमटवणार ठसा :
या रणजी ट्रॉफीमध्ये अनेक तरुण खेळाडू आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतील. यात फलंदाज आर. स्मरन (कर्नाटक), आंद्रे सिद्धार्थ (तामिळनाडू), यश धुल (दिल्ली), प्रियांश आर्य (दिल्ली), वैभव सूर्यवंशी (बिहार), आयुष म्हात्रे (मुंबई), दानिश मालेवार (विदर्भ) गोलंदाज हर्ष दुबे (विदर्भ), अधेन अॅपल टॉम (केरळ), मानव सुथार (राजस्थान) आणि गुर्जपनीत सिंग (तामिळनाडू) यांचा समावेश आहे.
2025-26 रणजी ट्रॉफी हंगामाचं स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.