अबुधाबी IND vs OMAN Face Today : 2025 च्या आशिया चषकात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. टीम इंडियाला अजूनही त्यांचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना ओमानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना आज 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघानं यापूर्वी एकूण 18 संघांविरुद्ध खेळलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ओमानचा सामना एकदाही केलेला नाही.
टीम इंडिया ओमानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार
भारतीय संघ अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्वरुपात ओमानविरुद्ध खेळलेला नाही. 19 सप्टेंबर रोजी होणारा सामना दोन्ही संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील टीम इंडियाच्या विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 249 सामने खेळले आहेत, ज्यात एकूण 18 संघांचा सामना झाला आहे, त्यापैकी 171 जिंकले आहेत आणि 71 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. टीम इंडियानं आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 18 संघांचा सामना केला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी ३२ सामने खेळले आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय विजयांमध्ये भारतीय संघ अव्वल
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. टीम इंडियानं 171 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान 275 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 157 सामने जिंकून यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.