Team India Looses : 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात सुपर-8 सामना झाला. या सामन्यात भारताचा 76 धावांनी पराभव झाला. या विश्वचषकात टीम इंडियाचा हा पहिला पराभव होता. यामुळं टी-20 विश्वचषकात गेल्या 12 सामन्यांमधील टीम इंडियाची विजयी मालिकाही खंडित झाली. दक्षिण आफ्रिकेनं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघानं 7 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 18.5 षटकांत 111 धावांवर सर्वबाद झाला. टी-20 विश्वचषकात धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिसची शानदार फलंदाजी :
या सामन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांच्या टॉप ऑर्डर फलंदाज एडेन मार्करामनं 4, क्विंटन डी कॉकनं 6 आणि रायन रिकेल्टननं 7 धावा केल्या. तीन जलद विकेट गमावल्यानंतर, डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी 50 चेंडूत चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसनं 29 चेंडूत 45 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि तीन षटकार मारले. डेव्हिड मिलरनं 35 चेंडूत 63 धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकार मारले. या दोघांसह ट्रिस्टन स्टब्सनं 24 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. इतर आफ्रिकन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंगनं दोन विकेट घेतल्या.
भारताच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी केली निराशा :
भारताचा धावांचा पाठलाग खराब होता. इशान किशन या सामन्यात चार चेंडूंचा सामना करत खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मागील तीन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्मानं 12 चेंडूत 15 धावा केल्या. या सामन्यात तिलकनं दोन चेंडूत एक धाव काढली. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवनंही संथ खेळी केली. त्यानं 22 चेंडूत 18 धावा केल्या. सुंदरनं 11 धावांचं योगदान दिलं, तर हार्दिकनं 18 धावांचं योगदान दिलं. या सामन्यात भारतीय फलंदाज निराश झाले. या सामन्यात भारताकडून शिवम दुबेनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 37 चेंडूत 42 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सननं 4 आणि केशव महाराजनं 3 बळी घेतले.











