Asia Cup 2025 : काल (28 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. आशिया चषकाच्या या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली. काल झालेल्या रोमांचित स्पर्धेच्या दरम्यान, तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने एकावेळी अशक्य वाटत असलेला विजय अखेर प्राप्त केला. भारत पाकिस्तानमधील वैर या स्पर्धेदरम्यान देखील पाहायला मिळाले. भारतीय संघाने सामन्यादरम्यान देखील पाकिस्तानवरील आपला राग दाखवत, स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी संघातील कोणत्याही सदस्याशी हात मिळवण्यास नकार दिला होता. तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैदानात आणि मैदानाबाहेर वादांची मालिका सुरु झाली होती. भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलचा सामना जितका चर्चेचा विषय बनला होता तेवढाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही नाट्यमय आणि चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे, आता भारतीय संघाने ट्रॉफी का घेतली नाही? असा सवाल विचारला जात असून या घटनेची जगभरात चर्चा सुरु आहे. दरम्यान, टीम इंडियाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही?, याबाबतचं कारण समोर आलं आहे.
भारतीय संघाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही? कारण आलं समोर
टीम इंडियाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. तर आता यामागील कारण समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, कि “आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. ” दरम्यान, भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर आशिया चषक आणि वैयक्तिक पदक पार्ट नेण्यात आली होती. त्यावर देखील देवजीत सैकिया यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, कि,”पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे”, असं देवजीत सैकिया म्हणाले.
नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वी हे एसीसीचे अध्यक्ष तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळेच, टीम इंडियाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या ट्रॉफी न घेण्याच्या हट्टानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी अडून होते. त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने कायम ठेवत शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतलीच नाही. अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. आणि मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलं होत. तसेच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं.