दुबई : आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं सहा विकेट्सनं विजय मिळवत नवव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 147 धावांची आवश्यकता होती. भारतानं तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चार विकेटच्या मोबदल्यात 150 धावा करत सामना आपल्या नावावर केला.
पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरगुंडी
या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीवीर साहबजादा फरहान आणि फकर झमान यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यावेळी पाकिस्तान संघ 200 धावांचा पल्ला सहज गाठेल, असं वाटत होतं. मात्र 113 धावांवर संघाला दुसरा धक्का बसला. इथून पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पुढच्या 33 धावांत संघानं 9 विकेट गमावल्या. परिणामी पाकिस्तानचा डाव 19.1 षटकांत 146 धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून साहबजादा फरहान (57), फकर झमान (46) आणि सॅम आयुब (14) या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. इतर फलंदाज मात्र पूर्णतः अपयशी ठरले. तर गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 तर अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरून चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
भारताची खराब सुरुवात
पाकिस्ताननं दिलेला 147 धावांचं लक्ष्य टीम इंडिया सहजरीत्या गाठेल, असं वाटत होतं. मात्र, 147 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाच्या 3 विकेट अवघ्या 20 धावांवर पडल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा (5), शुभमन गिल (12) आणि सूर्यकुमार यादव (1) हे पहिले तिन्ही फलंदाज या मोठ्या सामन्यात अपयशी ठरले. मात्र, यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन (24) यांनी 57 धावांची संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर तिलक वर्मानं शिवम दुबेसह भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचविलं.
आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने
भारतीय संघ आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत दोनदा पाकिस्तानशी खेळला आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या लीग स्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला 7 विकेट्सनं पराभूत केलं. त्यानंतर सुपर-4 मध्ये पाकिस्तानला भारताकडून 6 विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. आता आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. या आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केलं नाही. यामुळं वाद निर्माण झाला आणि सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू असामान्य पद्धतीनं आनंद साजरा करताना दिसले.