मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपली विजेतेपदाची मोहीम सुरू करणार आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर मंगळवारी दुपारी 3 वाजता भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ घरच्या मैदानाचा फायदा घेत 47 वर्षांनंतर पहिलं आयसीसी विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारात आहे. ही स्पर्धा तब्बल 12 वर्षांनंतर भारतात परतली असून यंदा एकूण 8 आघाडीचे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.
भारताचा आत्मविश्वास आणि दमदार तयारी :
भारताचा सध्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय व टी-20 मालिका जिंकून भारतीयांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. स्मृती मानधना सलामीवीर म्हणून संघाची प्रमुख शस्त्र ठरली असून तिने या वर्षी एकट्याने चार शतके ठोकत 115.85 च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त धावा काढल्या आहेत. तिच्यासोबत प्रतीका रावल आक्रमक सुरुवात करून देत असून, मधल्या फळीत कॅप्टन हरमनप्रीत कौरचा अनुभव संघाला मजबुती देतो आहे.
श्रीलंकेची महत्त्वाकांक्षा :
या विश्वचषकात सह-आयोजक असलेला श्रीलंका संघही कमी लेखण्यासारखा नाही. 2022 च्या स्पर्धेत त्यांना संधी मिळाली नव्हती, त्यामुळे यंदा संघ जास्तीचा जोर लावणार आहे. तरुण अष्टपैलू ड्यूमी विहांगा संघाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तिने अलीकडील तिरंगी मालिकेत 11 बळी घेत श्रीलंकेच्या गोलंदाजीला धार दिली आहे. भारताविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल.
स्पर्धेची रचना आणि प्रेक्षकांची उत्सुकता :
या विश्वचषकात 28 लीग सामने राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवले जातील. भारतातील 4 मैदानांसह कोलंबोमध्येही सामने होणार आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे बहुतांश सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले असून उपांत्य लढत व अंतिम सामना देखील तिथे खेळवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामने थेट पाहता येणार असून जिओ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंगचीही सोय आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या स्पर्धेबद्दल उत्साह शिगेला पोहोचला आहे.