कोलंबो : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमधील सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. ज्यामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीला पावसामुळं प्रत्येकी 31 षटकांच्या या सामन्यात त्यांनी 9 गडी गमावून 133 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानी महिला संघानं 6.4 षटकांत एकही गडी न गमावता 34 धावा केल्या, परंतु नंतर पंचांनी पावसामुळं सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळं पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानी संघाचं गुणाचं खातं उघडलं.
पावसामुळं पाकिस्तानला मिळाला एक गुण :
पाकिस्ताननं या स्पर्धेत एकही विजय नोंदवलेला नाही आणि तीन पराभवांनंतर ते गुणतालिकेच्या तळाशी आहेत. त्यांच्याकडे फक्त एक गुण आहे आणि आता त्यांचा सामना न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेशी आहे. पावसामुळं रद्द झालेला हा स्पर्धेतील तिसरा सामना होता. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया तसंच श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मागील सामनेही पावसामुळं वाया गेले होते.
Rain plays spoilsport as #ENGvPAK is called off in Colombo.#CWC25 | 📝: https://t.co/eLLN3RdiCo pic.twitter.com/3J5NBtPK6l
— ICC (@ICC) October 15, 2025
ऑस्ट्रेलियाला मोठं नुकसान :
हा सामना रद्द झाल्यामुळं, इंग्लिश महिला क्रिकेट संघाला एक गुण मिळाला आणि त्यांना अव्वल स्थान मिळालं. ऑस्ट्रेलिया आता चार सामन्यांनंतर 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका चार सामन्यांमधून 6 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, चार सामन्यांमधून 4 गुणांसह टीम इंडिया चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका अजूनही वाईट स्थितीत असल्याचं दिसून येतं. सध्या, फक्त भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघच उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.
हे हि वाचा : अफगाणिस्ताननं घेतला पराभवाचा बदला; बांगलादेशचा 200 धावांनी धुव्वा उडवत जिंकली मालिका
इंग्लंडच्या 78 धावांत 7 विकेट :
त्याआधी, पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना फातिमानं 27 धावांत 4 बळी घेतले आणि डावखुरी फिरकी गोलंदाज सादिया इक्बालनं 16 धावांत 2 बळी घेतले. पावसामुळं खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 25 षटकांत 79 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या. साडेतीन तासांच्या विलंबानंतर, सामना प्रत्येक संघासाठी 31 षटकांपर्यंत कमी करण्यात आला. चार्लोट डीन (33) आणि एमिली अर्लॉट (18) यांनी उर्वरित सहा षटकांत 54 धावा जोडून इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.