विशाखापट्टणम : महिला वनडे विश्वचषक 2025 च्या 13व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघानं एका रोमांचक सामन्यात भारताचा 3 विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय संघ 48.5 षटकांत 330 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं हे लक्ष्य 49 षटकांत तीन विकेट्स गमावून पूर्ण केलं. महिला वनडे इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग आहे. ऑस्ट्रेलियासाठी एलिस हिलीनं या सामन्यात कर्णधरपदाला साजेशी खेळी केली. तिनं शानदार शतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
हिलीची विक्रमी शतकी खेळी :
एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताकडून 331 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवाती पूर्वी हे लक्ष्य कठीण वाटत होतं. यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात आला नव्हता, परंतु ऑस्ट्रेलियन कर्णधारानं 142 धावांची संस्मरणीय खेळी खेळली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. डावाची सुरुवात करताना हिलीनं 107 चेंडूंच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार मारले. 265 धावांवर चौथ्या विकेटच्या रुपात ती बाद झाली, ज्यामुळं ऑस्ट्रेलियानं सामन्यावर नियंत्रण मिळवले. हिली व्यतिरिक्त संघाकडून फोबी लिचफिल्डनं 40, एल्सी पेरीनं 47 आणि अॅशले गार्डनरनं 45 धावा केल्या, ज्यामुळं विजयाचा मार्ग मोकळा झाला. भारताकडून श्री चरणीनं 3, दीप्ती शर्मानं 2 आणि अमनजोत कौरनं 2 बळी घेतले.
टीम इंडियाची दमदार सलामी :
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करताना भारतानं 330 धावा केल्या. प्रतिका रावलनं 96 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 75 धावा केल्या, तर मांधना हिनं 66 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 80 धावा केल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरलीन देओलनं 38, कर्णधार हरमनप्रीत कौरनं 22, जेमिमा रॉड्रिग्जनं 33 आणि रिचा घोषनं 32 धावा केल्या.
भारताचा दुसरा पराभव :
ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडनं 9.5 षटकांत 40 धावा देत 5 बळी घेतले. महिला विश्वचषकाच्या इतिहासात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या होती. तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारतीय संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनंही विशाखापट्टणममध्ये भारताचा पराभव केला होता.