Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरातने (Ashok Kharat) केलेले अश्लील कृत्य आता सर्वांसमोर आले आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी अशोक खरातवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशोक खरातने अनेकांची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाडल्याचंही समोर आलं आहे. सध्या अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून (SIT) केला जात आहे. यादरम्यान आता अशोक खरातबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 ने कमी; इंधन स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन दर
अशोक खरातला आलेला अर्धांगवायूचा झटका
अशोक खरातच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. दीड वर्षांपूर्वी अशोक खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण करणारा खरात हा उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांचं अतिसेवन करत होता. या उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे खरातचा प्रकृती बिघडली होती आणि त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळी त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्याच एका डॉक्टर भक्ताने त्याच्यावर उपचार केले होते.
अर्धांगवायू झटक्याचा मोठा परिणाम खरातवर झाल्याचं आता दिसून येत आहे. आजही खरातच्या एका हाताची हालचाल मर्यादित होत आहे. तसेच त्याच्या भुवईवरही या झटक्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. तर आता पोलिसांनी खरातच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असून यामध्ये त्याच्या प्रकृतीबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातची वासना सुटली नव्हती, तो महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांची फसवणूक करत राहिला होता.
खरातने महिला अधिकारी अन् बड्या अधिकाऱ्याच्या बायकोला ओढलेले आपल्या जाळ्यात
पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ढोंगीबाबा खरातने आपल्या जाळ्यात एका उच्चस्पद महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याच्या बायकोला ओढले होते. या दोन्ही महिलांची आर्थिक फसवणूक करत खरातने त्यांचेही लैंगिक शोषण केल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच या दोन्ही महिला खरातविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांनी ढोंगीबाबा अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. अशोक खरातचा एचआयव्ही रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. तर खरातच्या आणखी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून आणखी काही माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












