दुबई : आशिया चषकातील सुपर-4 फेरीतील पाचवा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट संघात येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्ताननं 11 धावांनी विजय मिळवत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या विजेतेपदाची लढाई होईल.
पाकिस्तानी फलंदाजांची हाराकिरी :
अंतिम सामन्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार झाकेर अलीनं नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. मात्र पाकिस्तानी फलंदाजांना या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाची धावसंख्या 5 असतानाच त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन पॅवेलियनमध्ये परतले होते. सुरुवातीला बसलेल्या या धक्क्यानंतर पाकिस्तानी संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. परिणामी त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 135 धावांपर्यंत मर्यादित राहिला. संघाकडून मोहम्मद हॅरीसनं सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद नवाज (25), शाहीन आफ्रिदी (19) आणि सलमान आघा (19) यांनी छोटेखानी खेळी केली. यामुळंच पाकिस्तानला आव्हानात्मक मजल मारता आली. गोलंदाजीत बांगलादेश कडून तस्किन अहमदनं सर्वाधिक 3 तर मेहंदी हसन आणि रीशद हुसेन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
बांगलादेशची फलंदाजी सपशेल अपयशी :
पाकिस्ताननं दिलेल्या 136 धावांच्या माफक लक्षाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या एका धावेवर संघाला पहिला धक्का बसला. यानंतर पाकिस्तान प्रमाणेच बांगलादेशच्याही ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. त्यांच्याकडून एकाही फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी त्यांचा डाव 124 धावांपर्यंत मर्यादित राहिला. संघाकडून शमीम हुसेननं सर्वाधिक 30 धावा केल्या तर सैफ हसन (15) आणि नरुल हसन (16) यांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र ये फलंदाज आपल्या खेळीला मोठ्या खेळीत रूपांतर करु शकले नाही. परिणामी संघाला पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजीत पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हरीस रौफ यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या.