Sangola exam paper theft : सध्या राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा (SSC Exam Paper 2026) सुरू आहेत. मात्र, त्यापुर्वी सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची (Vidyamandir School Examination Center) ‘स्ट्राँग रूम’ (Sangola Strong Room) फोडून अज्ञातांनी भूगोल विषयाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरल्याचे (50 Question Papers Stolen) उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे उद्या होणाऱ्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका आज चोरीला गेल्याने अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. या घटनेमुळे उद्या पेपर होणार का नाही? याविषयी शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – केरळ स्टोरी! पहिल्या बायकोचा फोन अन् प्रेमाचा बुरखा फाटला, दक्ष वैद्य नावाचा मुलगा इक्बाल शेख निघाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी शिक्षण विभाग आणि संबंधित कर्मचारी हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आले असता स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेचे सर्व पेपर ठेवण्याचे स्ट्रॉंग रूम असून या स्ट्रॉंग रूम मधून ही चोरी झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता या स्ट्रॉंग रूम जवळ अधिकारी पोचल्यावर कुलूप कापल्याचे दिसून आले.
धक्कादायक बाब म्हणजे, या स्ट्रॉंग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. या ठिकाणी बंदोबस्ताला असलेला कर्मचारी देखील ही घटना घडताना कुठे होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र थेट बोर्डाचे पेपर ठेवलेले स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिकाची चोरी होणे हा अतिशय धक्कादायक आणि चिंतेचा प्रकार आहे. या घटनेनंतर सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांच्यासह पोलिस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेमुळे उद्या होणाऱ्या दहावीच्या भूगोल पेपरच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण मंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






