Sakshi’s dance : भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला ७ धावांनी नमवून T20 विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या या शानदार विजयाचा आनंद संपूर्ण देश साजरा करत असतानाच, सोशल मीडियावर मात्र एका वेगळ्याच घटनेची चर्चा रंगली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ‘टॉप ट्रेंडिंग’ आहे.
या महत्त्वाच्या सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह स्टँड्समध्ये उपस्थित होता. इंग्लंडच्या डावातील १८ व्या षटकात असं काही घडलं की ज्यानं सोशल मीडियाला वेड करून सोडलंय. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. इंग्लंडचा फलंदाज सॅम करनने एक जोरदार शॉट मारला, जो बुमराहने आपल्याच फॉलो-थ्रूमध्ये अप्रतिमरीत्या अडवला.
हेही वाचा – ‘त्या’ जबरदस्त कॅचने मॅच पलटवणारे, ‘बापू’ तेव्हाही इंग्रजांना भारी पडले अन् आत्ताही
उत्साहाच्या भरात साक्षी उडी मारून जल्लोष करू लागली
दूरून पाहणाऱ्या साक्षी धोनीला असे वाटले की बुमराहने हा कॅच टिपला आहे आणि इंग्लंडचा फलंदाज बाद झाला आहे. उत्साहाच्या भरात साक्षी आपल्या जागेवरून उडी मारून जोरात जल्लोष करू लागली. मात्र, रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की चेंडू जमिनीला लागून बुमराहच्या हातात गेला होता, त्यामुळे तो बाद नव्हता. शेजारीच बसलेल्या महेंद्रसिंग धोनीने हे बघितलं आणि त्याने अतिशय शांतपणे साक्षीला हाताने इशारा करत “खाली बस, आऊट नाहीये” असे सांगितलं. धोनीच्या या प्रतिक्रियेवर साक्षीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि नेटकऱ्यांनी याला “हसबंड ऑफ द इयर” तसेच “कॅप्टन कूलचा रिअॅलिटी चेक” अशा कमेंट्ससह व्हायरल केले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा इंग्लंडचा निर्णय
कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली, पण खरं वादळ आलं ते संजू सॅमसनच्या रूपात. संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याला ईशान किशन ३९ धावा आणि शिवम दुबे याची ४३ धावा करत मोलाची साथ मिळाली. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद २५३ ही विक्रमी धावसंख्या उभारली. T20 विश्वचषकाच्या नॉकआउट इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात
२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यांचा युवा फलंदाज जेकब बेथेलने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. बेथेलने मैदानाच्या चोहोबाजूंनी फटकेबाजी करत केवळ ४८ चेंडूंमध्ये १०५ धावांचे स्फोटक शतक झळकावले. तो जोपर्यंत खेळत होता, तोपर्यंत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला वाटत होता. मात्र, बुमराह आणि हार्दिक पंड्याने मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी जास्त धावांची गरज होती, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचा डाव २४६ धावांवर रोखला.
योगायोग म्हणजे भारताने हा सामना नेमका ७ धावांनी जिंकला. ७ हा क्रमांक महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर आहे आणि सामना पाहण्यासाठी खुद्द धोनीच स्टेडियमवर होता. यामुळे धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर “Thala for a reason” म्हणत ट्रेंड सुरू केला. या विजयासह भारताने आता विश्वविजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
न्यूझीलंडने भारताला घरचा रस्ता दाखवला
आता भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, ८ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला घरचा रस्ता दाखवला होता, त्यामुळे आता या ‘फायनल’मध्ये भारत त्या पराभवाचा बदला घेऊन ट्रॉफी उचलणार का, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. पण सामना कुणाचीही असो धोनीची चर्चा होणार नाही, असं होतंच नाही. मग ते ट्रोलिंग असो किंवा आता साक्षीचा हा व्हिडिओ असो. ट्रेडिंगमध्ये तर राहणारच.






