Israel Attack On Hezbollah | अमेरिका (US) आणि इराणने (Iran) समजूतीने करार करत युद्धविरामाची घोषणा केली आहे. एकिकडे या देशांनी युद्धविरामाची घोषणा केली असतानाच दुसरीकडे इस्त्रायलने (Israel) हिजबुल्लाहच्या (Hezbollah) क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना, कमांड सेंटर्सना आणि गुप्तचर यंत्रणांना टार्गेट केले आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात हिजबुल्लाहचे नवे प्रमुख नईम कासिम यांचा पुतण्या अली युसूफ हर्शी हा ठार झाला आहे.
हेही वाचा – अखेर समीकरणे बदलली! काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, सुनेत्रा पवारांचा मार्ग क्लिअर
इस्रायलने नेमका काय केला दावा?
बुधवारी (8 एप्रिल) लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यात कासिमचा पुतण्या युसूफ याला ठार केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्रायलने ठार केलेल्या हिजबुल्लाहचे माजी प्रमुख हसन नरसल्लाह यांच्या हत्येनंतर कासिम यांची नियुक्ती करण्यात आली होती. नईम कासिम हे पूर्वी हिजबुल्लाहचे उपप्रमुख होते. नंतर ते नवे प्रमुख बनले. तसंच असंही सांगितले जात आहे की, इस्रायलने या हल्ल्यात कासिम यांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते सुदैवाने बचावले.
इस्रायल संरक्षण दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, काल रात्री (8 एप्रिल) बेरूतमध्ये दहशतवादी तळांवर झालेल्या आयडीएफच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचे महासचिव कासिम यांचे वैयक्तिक सचिव आणि पुतणे अली युसूफ हरशी हे ठार झाले आहेत. अली युसूफ हरशी हे हिजबुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांचे निकटचे सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होते. त्यांच्या कार्यालयाच्या व्यवस्थापन आणि सुरक्षेत त्यांची मध्यवर्ती भूमिका होती.
इस्त्रायलच्या लष्कराने लेबनॉनमधील दोन महत्त्वाच्या सीमा चौक्यांवर हल्ला केला ज्यांचा वापर हिजबुल्लाहचे दहशतवादी उत्तरेकडील लिटानी प्रदेशातून दक्षिणेकडील लिटानी प्रदेशात शस्त्रे, रॉकेट वाहून नेण्यासाठी करत होते. तसेच लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमध्ये 112 जण ठार झाले आहेत. तर 837 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संबंधित भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, इस्त्रायने केलेल्या हल्ल्यांनंतर बेरूतच्या अनेक भागांवर आकाशातून दाट काळ्या धुराचे लोट पसरले होते. तेथील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली होती आणि अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. यातील अनेक हल्ले हे दुकाने आणि बाजारपेठा असलेल्या गर्दीच्या भागांमध्ये झाले आहेत.












