income tax department : अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat)आता आयकरच्या रडारवर आला आहे. अशोक खरात याच्या मालमत्ताची आयकर विभागाकडून (income tax department) आता चौकशी केली जाणार आहे. त्यामुळं अशोक खरात याचा पाय आणखी खोलात गेला आहे. गेले चार दिवस नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यामळे राज्यात खळबळ उडाली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करताना अशोक खरात याने किती कोटी संपत्तीची माया जमवली याची तपासणी केली जाणार आहे.
पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून गोळा करण्याचे काम
या प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून (SIT) गोळा करण्याचे काम सुरू आहेत. खरातचे जबाब देखील नोंदवून घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शनिवारी एसआयटीकडून (SIT) खरातची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. आयपीएल तेजस्वी सातपुते (tejswi satpute) यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून ही चौकशी करण्यात आली. या तपासानंतर आता नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाने एंट्री घेतली आहे.
कोट्यवधींच्या व्यवहारांची यात तपासणी होणार
दरम्यान, एसआयटीकडून (SIT) तपास सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची यात तपासणी होणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार असून देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे देखील रडारवर येणार असल्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे जमिनीच्या व्यवहाराच्या संबधीत असणारे ही पोलिसांच्या रडारवर आहेत.
खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याचीही शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 52 सातबारा अशोक खरात आणि कुटूंबियांच्या नावावर आहेत. काही सामायिक सातबारावर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचे तपासत उघड झालं आहे. या मोठ्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ करून संयुक्त तपास आता आयकर विभागाकडून केला जाणार आहे. तर बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची देखील चौकशी केली जाणार आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार असून या चौकशीतून खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याचीही शक्यता आहे.
विशेष तपास पथकाची स्थापना
अशोक खरात याला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएस तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत. शनिवारी दुपारी अशोक खरात याला चौकशीसाठी कार्यालयात आणण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सात तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.












