Iranian Oil is Called ‘Black Gold’: इराणचं तेल, ज्याला जग ‘काळं सोने’ म्हणतं, फक्त इंधन नाही तर जगातील ऊर्जा बाजरातील महत्वाचा घटक आहे. त्याच्या खास रासायनिक गुणधर्मांमुळे रिफायनरीजना जास्त इंधन आणि नफा मिळतो. चला पाहूया, ‘काळ्या सोन्या’ मागचं रहस्य काय आहे.
आज आपण कारमध्ये पेट्रेल भरतो किंवा विमानाने प्रवास करतो, तेव्हा त्या इंधनाच्या निर्मितीमागे केवळ उद्योग नाही तर अत्यंत सूक्ष्म गणित आणि रसायनशास्त्र कार्यरत असते. रिफायनरी अभियंते कच्च्या तेलातील प्रत्येक घटकाच्या अभ्यास करून त्यातून जास्तीत जास्त उपयोगी इंधन कसे मिळेल याची योजना आखतात.
गेल्या अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही अनेक देशांच्या रिफायनरीज इराणचे तेल खरेदी करणे पसंत करतात. यामागे केवळ राजकीय कारणे नसून तेलाच्या रासायनिक गुणधर्मांचेही मोठे योगदान आहे.
कच्च्या तेलाची रचना कशी असते?
कच्चे तेल म्हणजे एकसारखा द्रव नसतो. त्यामध्ये हजारो प्रकारचे हायड्रोकार्बन रेणू असतात. या रेणुमंध्ये कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळ्या असतात. लहान साखळ्यांपासून पेट्रोल आणि जेट इंधन तयार होते. मोठ्या आणि जड साखळ्यांपासून डांबर किंवा इतर कमी किमतीची उत्पादने बनतात.
API गुरुत्वाकर्षण म्हणजे काय?
कच्च्या तेलाची गुणवत्ता प्रामुख्याने दोन गोष्टींवर ठरते. त्याची घनता आणि त्यातील सल्फरचे प्रमाण. घनता मोजण्यासाठी API ग्रॅव्हिटी हा मापदंड वापरला जातो. पाण्याचे API मूल्य 10 असते. त्यापेक्षा जास्त API असलेले तेल तुलनेने हलके मानले जाते.
इराणी तेलाची विशेषता
इराणच्या हलक्या कच्चा तेलाचे API साधारणपणे ३३ ते ३६ दरम्यान असते. त्यामुळे ते ना खूप हलके असते. ना खूप जड म्हणजेच ते मध्यम श्रेणीत येते. म्हणूनच जगातील बहुतेक रिफायनरीजसाठी अशी गुणवत्ता सर्वाधिक योग्य मानली जाते.
डिस्टिलेशनमधून मिळणारे उत्पादन
इराणी हलक्या कच्च्या तेलातून इंधनाचे चांगले प्रमाण मिळते. एका बॅरल तेलातून साधारणतः सुमारे 20% हलके डिस्टिलेट्स सुमारे 50% मध्यम डिस्टिलेट्स (डिझेल, जेट इंधन, हीटिंग ऑइल) मिळतात. त्यामुळे रिफायनरीजना अधिक आर्थिक फायदा होतो.
सल्फर काढण्याची महागडी प्रक्रिया
तेलातील सल्फर काढण्यासाठी हायड्रोडेसल्फरायझेशन नावाची प्रक्रिया वापरली जाते. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक असून जवळपास 450°C तापमान आणि प्रचंड दाब लागतो. परंतु इराणी तेलातील सल्फरचे प्रमाण संतुलित असल्यामुळे अशी महागडी प्रक्रिया तुलनेने कमी प्रमाणात करावी लागते.
अमेरिकन तेल का वापरत नाहीत?
काही वेळा प्रश्न पडतो की रिफायनरीज अमेरिकन किंवा इतर देशांचे तेल का वापरत नाहीत. अमेरिकेतील शेल तेल (WTI) खूप हलके असते. त्याचे API 39 पेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यातून नॅफ्था जास्त तयार होते, पण डिझेल व जेट इंधन कमी मिळते. मध्यम क्षमतेच्या रिफायनरीजसाठी हे कमी फायदेशीर ठरते.
व्हेनेझुएलाचे तेल खूप जड
व्हेनेझुएलाचे तेल मात्र अत्यंत जड असते. त्याचे API 8 ते 10 इतके कमी असते. हे तेल पाइपलाइनमधून वाहून नेणेही कठीण असते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोकर आणि हायड्रोक्रॅकरसारखी महागडी यंत्रणा बसवावी लागते.
इराणी तेलाला ‘काळे सोने’ का म्हटले जाते?
या दोन्ही टोकांच्या तुलनेत इराणचे तेल संतुलित गुणधर्म असलेले आहे. त्यामुळे मोठे अतिरिक्त खर्च न करता रिफायनरीज त्यातून अधिक इंधन आणि अधिक नफा मिळवू शकतात. यामुळेच जागतिक ऊर्जा बाजारात इराणच्या ‘काळ्या सोन्या’ला विशेष स्थान मिळाले आहे.









