टोकियो : जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान पदावर महिला विराजमान होणार आहे. सनाई ताकाईची यांच्या रुपानं जपानला पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या. जपानच्या वरिष्ठ सभागृहानं सनाई ताकाईची यांची जपानच्या पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. सभागृहात त्यांना 125 मतं मिळाली. वरिष्ठ सभागृहात बहुमत मिळण्यासाठी 124 मतांची आवश्यकता असते. यापूर्वी त्यांना कनिष्ठ सभागृहात 237 मतं मिळाली. कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळण्यासाठी 233 मतांची आवश्यकता असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल सनाई ताकाईची यांचं अभिनंदन केलं. “भारत-जपान देशातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे. इंडो-पॅसिफिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आपले संबंध दृढ करणं महत्त्वाचं आहे,” अशी पोस्ट पंतप्रधान मोंदींनी सोशल मीडियावर केली.
आधीचं झालं होतं पंतप्रधानपद निश्चित
चीन समर्थक आणि सामाजिक रूढीवादी असलेल्या सनाई ताकाईची यांनी पंतप्रधान पदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी युती करार केला. यानंतर सभागृहानं त्यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या सनाई ताकाईची यांना जपान इनोव्हेशन पार्टीच्या पाठिंब्यानं पंतप्रधान पद मिळण्याचा अंदाज होता.
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी दिला राजीनामा
जपानचे मावळते पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. शिगेरू इशिबा यांनी सुमारे एक वर्षापूर्वी जपानच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजण्याच्या काही काळापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी आपले राजीनामा सादर केले. यामुळं इशिबा मंत्रिमंडळाचा राजीनामा औपचारिकपणे मिळाला.