Kalpana Kharat fake baba case : दोन दिवस झाले अशोक खरातची बायको गेली तरी कुठं? हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलाय. तिला अटक करण्यासाठी SIT आणि शिर्डी पोलिसांची दोन स्वतंत्र पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली खरी पण ना ती नाशिकला सापडेना ना पुण्याला? मग ही कल्पना खरात नेमकी लपली तरी कुठंल्या घरात? अशी चर्चा आता रंगू लागलीय.
कल्पना खरातचं माहेर सिन्नर तालुक्यातलं पाडळी! तिच्या माहेरची परिस्थिती तशी हलाखीची. तिच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला, तर वडलांचं आजारपणात निधन झालं. सध्या तिच्या माहेरच्या घरात वृद्ध आई, विधवा भावजय आणि लहान भाचा राहात असून त्यांची परिस्थिती दयनीय असल्याचं सांगितलं जातंय. कल्पनाचा एक भाऊ सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘शिव संकल्प हार्डवेअर’ या दुकानाचा व्यवसाय पाहातो, तर दुसरा भाऊ नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
माहेरच्या कुटुंबाशी तिचा संपर्क कमी झाला
एका नातेवाइकामार्फत अशोक खरातशी कल्पनाचं लग्न जुळवण्यात आलं. दोघांच्याही वयात मोठा फरक. मात्र, असं असूनही लग्नाचा खर्च खरात कुटुंबीयानं उचलण्याची तयारी दर्शवल्यानं अखेर हे लग्न ठरलं. लग्नानंतर मात्र कल्पनाचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि ती ऐशोआरामाचं जीवन जगू लागली. तिचे माहेरशी संबंधही हळूहळू दुरावू लागले. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, ती पाडळीला क्वचितच यायची जायची. माहेरच्या कुटुंबाशी तिचा संपर्कही कमी झाला होता.
दोघांनी मिळून गोरगरिबांच्या शेतजमिनी लाटल्या
माहेरच्या सुनीताची सासरी कल्पना झाल्यावर तिला काय काय मिळालं याची कल्पनाच न केलेली बरी! खरात 10 वी नापास आणि याला बायको पाहिजे होती इंग्रजी बोलणारी! मग काय या दोघांनी मिळून आधी गोरगरिबांच्या शेतजमिनी लाटण्याचा उद्योग केला आणि मग श्रीमंतांना नादी लावून त्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला. खरातनं भविष्य सांगण्याचा नवा फंडा सुरू करून मग अनेकांना यड्यात काढायला सुरुवात केली.
उच्चपदस्थ अधिकारी, नेतेमंडळी, मंत्री-संत्री खरातच्या जाळ्यात
भोळीभाबडी जनता त्याच्या भूलथापांना तर बळी पडलीच पण चांगली शिकली-सवरलेली माणसं देखील या बाबाला भुलली. उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, नेतेमंडळी, मंत्री-संत्री त्याच्या जाळ्यात अलगद अडकू लागले आणि त्याच्या दरबारात नियमित हजेरी लावून त्याचे पाय धुवू लागले. खरात बाबा अंधभक्तांसाठी गुरुमाउली बनला आणि कल्पनाला शेजारी बसवून तिलाही गुरुमाउलीणीचा स्वयंघोषित दर्जा देऊन टाकला.
नवरा कुठल्या मार्गानं पैसे कमावतो याची कल्पना बायकोला नाही?
आता तुम्हीच मला सांगा, आपला नवरा काय उद्योग करतो, कुठल्या मार्गानं पैसे कमावतो याची कल्पना या कल्पनाला नसेल का हो? अहो, मी तर म्हणतो त्याच्या प्रत्येक पापात ती देखील तितकीच वाटेकरी असेल? पण ऐशोरामाचं जीवन जगण्याची चटक लागल्यावर ती तरी कशाला मागं राहिलं? ते आपल्या गावाकडं बोलतात नाही का? वडा जेवढं वडता येईल तेवढं? याला म्हणतात, कधी नाय मिळलं नि गटकन गिळलं!
एसआयटीचं पथक खरातच्या घरी जाण्याआधीच बायको फरार
शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहाराचं फसवणूक प्रकरणात तिचं नाव समोर आलं आणि कल्पनाला पकडण्यासाठी पोलिसांनी प्लॅन आखला. मात्र एसआयटीचं पथक खरातच्या घरी जाण्याआधीच ती घरातून निसटली आणि फरार झाली. एवढा प्लॅन आखून, सापळा रचून पोलिसांच्या हाती कोण लागलं तर खरातचा मुलगा हर्षवर्धन! काय झालं शेवटी, चौकशी झाली आणि सोडून दिलं.
खरातसह त्याच्या कुटुंबाचाही आर्थिक व्यवहारात मोठा सहभाग
खरातसह त्याच्या कुटुंबाचाही आर्थिक व्यवहारात मोठा सहभाग असल्याचा संशय आधीपासूनच व्यक्त केला जात होता. अशा परिस्थितीत SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू होत असतानाच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर पोलिसांनी पाळत का ठेवली नाही? तो 14 दिवस पोलीस कोठडीत असताना त्याच काळात त्याच्या बायकोला ताब्यात घेऊन दोघांना समोरासमोर पोलिसांनी चौकशीसाठी का? बसवलं नाही.
खरातला घरातून ताब्यात घेताना बायकोचा धिंगाणा
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटल्यानंतर आता कुठं पोलीस खडबडून जागे झाले आणि दोन पथकं तिला शोधून काढण्यासाठी रवाना केली. खरातला त्याच्या घरातून ताब्यात घेताना त्याच्या बायकोनं म्हणजे याच कल्पनानं धिंगाणा घातला होता म्हणे! तुम्ही कुणाला अटक करताय? त्यांना अटक करून काही होणार नाही. थोडं थांबा वरतून फोन येतील तेव्हा तुम्हाला कळेलच, असा दम या खरातच्या बायकोनं भरला होता हे पोलीस विसरले वाटतं?
कित्येक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा तिच्या नवऱ्यावर आरोप असतानाही माझ्या नवऱ्याचं 50 जणांनी शोषण केल्याचं ही बाई सांगत फिरत असल्याची चर्चा होतेय. यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा! हे सगळं जाऊद्या… खरातची बायको आधी कुठं लपून बसलीये का तिला कुणी लपवलंय हे आधी शोधा!










