Maharashtra Auto Driver Rule: महाराष्ट्रातील रिक्षाचालकांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात काम करत असाल, तर तुम्हाला मराठी बोलता येणे अनिवार्य आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
महाराष्ट्रातील रिक्षाचालकांसाठी ( Auto Driver ) सरकारकडून एक महत्वाचा आणि कठोर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रिक्षा सेवा देणाऱ्या प्रत्येक चालकाला आता मराठी भाषा बोलता येणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा, तसेच स्थानिक नियमांचे पालन सुनिश्चित व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: मोठी अपडेट! MPSC मार्फत गट-ब संयुक्त परीक्षा 2026 साठी भरती जाहीर; अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून, मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर पुढील कारवाईचा विचार केला जाईल. यामध्ये परवाना तपासणीपासून ते आवश्यक असल्यास परवाना रद्द करण्यापर्यंतच्या उपाययोजना लागू केले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा सेवेत मोठे बदल अपेक्षित आहेत. रिक्षाचालकांच्या पात्रतेबाबत आता अधिक कठोर निकष लागू होण्याची शक्यता असून, परवाना प्रक्रियेतही मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी केली जाऊ शकते.
दरम्यान, या निर्णयानंतर रिक्षाचालकांमध्ये चर्चा सुरू झाली असून काहींनी याला सकारात्मक पाऊल म्हटले आहे, तर काहींना नवीन अटींमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. एकूणच, हा निर्णय राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरण्याची चिन्हे आहेत.












