नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवी ही नवदुर्गांमधील नववी आणि अंतिम देवी असून ती सर्व सिद्धींची (अलौकिक शक्ती आणि क्षमता) दाता आहे, असे मानले जाते. सिद्धीदात्री देवी भक्तांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करते. देवी सिद्धीदात्रीचे स्वरूप हे महाकाली देवीचा एक पैलू असून, ती कमळावर आसनस्थ असून तिला चार हात आहेत. देवीच्या हातात चक्र, शंख, गदा आणि कमळ अशी शुभचिन्ह आहेत.
सिद्धीदात्री देवीची कथा आणि महत्त्व
सिद्धीदात्री हि नवदुर्गांमधील अंतिम दुर्गा असून नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या उपासनेची सांगता सिध्दिदात्रीच्या पूजनाने होते. सिद्धीदात्री देवीच्या नावाचा अर्थ असा होतो कि,’सिद्धि’ म्हणजे अलौकिक शक्ती किंवा क्षमता आणि ‘दात्री’ म्हणजे देणारी. या नावावरून सिद्धीदात्री देवी सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे, असे स्पष्ट होते. यासोबतच, असे मानले जाते, की तिची पूजा केल्याने भक्तांना अष्टसिद्धी प्राप्त होतात. या अष्टसिद्धी म्हणजे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. याशिवाय, एक अशीही आख्यायिका प्रचलित आहे की, शिवाचे अर्धे अंग देवीचे आहे, त्यामुळे तिला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. सिद्धीदात्रीच्या उपासनेने देवी सिद्धीदात्री भक्तांना अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवते आणि मोक्षाचा मार्ग सुकर करते, असे मानले जाते.
पूजेचे स्वरूप
सिद्धीदात्री देवी कमळाच्या आसनावर विराजमान असून चतुर्भुज आहे. तिच्या चार हातात चक्र (विष्णूचे प्रतीक), शंख, गदा (शक्तीचे प्रतीक) आणि कमळ अशी शुभचिन्ह आहेत. नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा करून सिद्धी आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. तसेच सिद्धीदात्रीच्या पुजनाने नवरात्रीची सांगता होते.
देवीचा ध्यान मंत्र
“वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥”
नवरात्रातील नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची आराधना या मंत्रांने केल्यास देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.