मागील अनेक दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर विभागाला महापुराने घेरले असून यामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप महाराष्ट्राला पावसाच्या संकटातून मुक्ती मिळेल असं वाटत नाही. कारण बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत ढगाळ हवामान आणि पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. एवढंच नाही तर राज्यात मान्सून किमान 5 ऑक्टोबरपर्यंत तरी कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांना शेतीचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे पावसाचा अंदाज?
26 सप्टेंबर : ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज
मराठवाडा आणि दक्षिण विदर्भ भागांमध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन पावसामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडू शकतो.
27 सप्टेंबर: पावसाचे प्रमाण आणि क्षेत्र वाढणार
दक्षिण मराठवाड्यात या दिवशी मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असून उर्वरित मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे अपेक्षित आहे. तसेच दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस, याशिवाय उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम, तर सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असुन खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडेल.
28 सप्टेंबर: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोर अधिक
या दिवशी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई महानगर म्हणजे मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात परिसरातही पाऊस अपेक्षित असून, काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम, तर उर्वरित विदर्भात हलका पाऊस अपेक्षित आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून धरण साठ्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे, अशी सूचना केली आहे. विशेषतः, काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं सांगण्यात आले आहे.