Pune Sinhgad Dental Collage HOD Suicide | पुणे (Pune) शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर याच विद्येच्या माहेरघरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. नामांकित कॉलेजच्या एका प्राध्यापकानं आत्महत्या (Suicide) करत आपले जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – पुण्यात महिला दिनी PMPML ची मोठी घोषणा; महिलांना मिळणार खास गिफ्ट
पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या (Sinhgad Dental Collage) प्राध्यापकांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजू पाटील असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचं नाव आहे. तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राध्यापकांनी आत्महत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक राजू पाटील हे पुण्यातील नामांकित सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख (HOD) म्हणून काम करत होते. तर आता त्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राजू पाटील यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जेव्हा राजू पाटील यांच्या पत्नी घरी आल्या तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार निदर्शनास आला आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पोलिसांना पाटील यांच्या रूमध्ये सुसाइट नोट सापडली. या नोटमध्ये पाटील यांनी आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
कामाचा ताण वाढल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं, राजू पाटील यांनी त्यांच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं असल्याची, प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर आत्महत्येचं फक्त एवढंच कारण आहे की आणखी काही कारणं आहेत? हे अद्याप समजू शकलेले नाहीये. पण, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सिंहगड डेंटल कॉलेजची मान्यता मागील काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आली होती. कारण विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक दर्जानुसार कॉलेडचे कामकाज नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या कॉलेजमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असंलग्नित करण्यात आला होता. तसेच विद्यापीठ अधिनियममधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपकाही महाविद्यालयावर ठेवण्यात आला आहे.
विद्यापीठाकडून शैक्षणिक नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिंहगड डेंटल कॉलेजवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नियंमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंहगड डेंटल कॉलेज आणि रूग्णालयाची संलग्नता रद्द केली आहे. यादरम्यान, कॉलेजचे प्राध्यापक राजू पाटील यांनी आत्महत्या केल्यामुळे आणि त्यात त्यांनी सुसाइड नोटमध्ये कामाचा ताण असल्याचा उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.












