Sonali Mandlik Maharashtra Kesari : सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ स्पर्धेत रीलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिचा पहिल्याच कुस्तीत पराभव झाल्याने तिच्या चागंलेच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी सोनालीला हा मोठा धक्का बसला. त्यानंतर सोनालीने धाडशी निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
सोनालीने स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्रूंना वाट मोकळी करत आपण आर्थिक अडचणीमुळे, स्पॉन्सरशीप व खुराक मिळू न शकल्यामुळे तसेच ओपनला खेळण्यासाठी ६५ च्या पुढे वजन न वाढल्यामुळे आपणास स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असल्याची खंत बोलून दाखवली आहे.
चौथ्या महाराष्ट केसरी स्पर्धेत रंगत
सोलापुरातील हरीभाई प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या महाराष्ट केसरी स्पर्धेत रंगत पाहायला मिळत आहेत. पहिल्याच दिवशी अहिल्यानगरची रीलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिची निवड न झाल्यानंतर तिने कुस्तीला अखेरचा रामराम केला आहे.
खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक पटकावले
सोनाली मंडलिक ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील एक प्रतिभावंत महिला कुस्तीपटू आहे. खेलो इंडिया मध्ये तिने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. गरिबीमधून तिने संघर्ष करत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. मात्र सोलापुरातील चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड न झाल्यामुळे तिने कुस्तीला रामराम ठोकण्यात आल्याची घोषणा केली आहे.
पत्र्याच्या शेडमध्ये कुस्तीला सुरुवात
सोनाली मंडलिकिने अत्यंत कठीण परिस्थितीतून कोणत्याही साधनांशिवाय पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीमध्ये कुस्तीला सुरुवात केली. ओतूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत तिने चांदीची गदा आणि रोख पुरस्कार जिंकला आहे. सोनाली हिच्या कुस्तीमुळे आदर्श घेऊन अनेक महिला कुस्तीपटूंनी राज्यभरात नाव मिळवले आहे.
सोशल मीडियावर रडत रडत कुस्तीला रामराम
मात्र, सोलापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ओपन गटात निवड होऊ न शकल्यामुळे नाराज झालेल्या सोनाली मंडलिकने तातडीने सोलापूर सोडले आणि सोशल मीडियावर रडत रडत कुस्तीला रामराम करत असल्याची घोषणा केल्यामुळे महिला कुस्ती खेळाडूंमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.








