Donald Trump | मागील काही दिवसांपासून अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने आणि इस्त्रायलने मिळून इराण देशावर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू झाला होता. तर या हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणने देखील अमेरिकेच्या लष्कर तळांना लक्ष्य करत जोरदार हल्ले केले होते. या युद्धामध्ये तिन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तिन्ही देशांसोबतच इतर देशांनाही या युद्धाचा जोरदार फटका बसलेला दिसत आहे. त्यामुळे या तिन्ही देशांना युद्ध थांबवण्याची मागणी इतर देशांकडून केली जात आहे. अशातच आता या युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे जगभरात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – जगात खळबळ! इराणचा अमेरिकन सैनिकांबाबत धक्कादायक दावा, डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली
युद्धाबाबत ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
हे युद्ध जवळपास संपले असल्याचे मोठे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच यावेळी ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता इराण, इस्त्रायल आणि अमेरिका या तिन्ही देशांमधील युद्ध थांबलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हे युद्ध जवळपास संपले आहे. तसेच मी जगाला कोणत्याही दहशतवादी राजवटीला ओलीस ठेवू देणार नाही. तेल पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्नही करू देणार नाही. मात्र, जर इराणने काही केले तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागले. अमेरिका इराणवर बारीक नजर ठेवून आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, सध्या अमेरिकेने इराणमधील काही वीज निर्मिती केंद्रांना टार्गेट केलेले नाही. पण जर इराणने काही केलं तर मात्र आम्ही त्यांच्या ऊर्जा केंद्रांना पुन्हा टार्गेट करू आणि हल्ला करू, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.
तेलाच्या किमती कमी होणार?
इराणने युद्धादरम्यान जागतिक शिपिंग आणि तेल पुरवठ्याला निर्माण केलेला धोका निष्प्रभ होईल. त्यामुळे तेलाच्या किंमतींमध्ये घसरण होणार आहे. अमेरिकेतील नागरिकांसाठी तेलाच्या किंमती कमी होतील, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
युद्धामध्ये इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेहरानमध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत काहीही उरेलेल नाहीये, असा दावा ट्रम्प यांनी केली आहे. तसेच जवळपास सर्व देशांची हीच इच्छा आहे की हे युद्ध थांबले पाहिजे. कारण या युद्धाच्या परिणाम सर्व देशांवर होताना दिसत असून गॅस, तेलाचा मोठा तुडवडा निर्माण होताना दिसत आहे.












