Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. तर खरातने अनेक पुरूषांची आर्थिक फसवणूक केल्याचंही उघडकीस आलं आहे. आत्तापर्यंत खरातवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 2 गुन्हे हे दोन व्यक्तींची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाड्यावरून दाखल करण्यात आले आहेत. तर बाकी गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. तर खरातवर अजुनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मोठी दुर्घटना! काँग्रेस खासदाराच्या कारचा मोठा अपघात; ट्रकच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर
अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत खुलासे होणार?
मागील 2 आठवड्यांपासून एसआयटीकडून (SIT) आणि नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडलेल्या जमीन जुमला अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तर आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचा आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्यामुळे आता खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरातची 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असून त्यावर आता एसआयटीची करडी नजर आहे. तर आता लवकरच अशोक खरातच्या सीएची चौकशी केली जाणार आहे. ही सीए केवळ खरातचे आर्थिक व्यवहारच सांभाळत नव्हता तर तो शिवानीका संस्थेच्या आजी माजी सदस्यांचा देखील आर्थिक व्यवहार पाहत होता. त्यामुळे आता या सीएची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार असून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवानिका ट्र्स्टच्या व्यवहाराप्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) रूपाली चाकणकरांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसआयटीने अशोक खरातशी संबंधित शिवानिका या संस्थेचा तपास करण्यास सुरूवात केली आहे. या संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी एसआयटी करत आहे. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांच्यासोबत आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. राजकीय वर्तुळातून रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले जात आहेत.












