Afghanistan Floods : अफगाणिस्तान पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं अचानक पूर आला आहे. पुरामुळं आतापर्यंत किमान 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या आपत्तीत अकरा जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं या आपत्तीची माहिती जाहीर केली.
पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान :
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी गुरुवारी देशातील पुराची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की या आपत्तीमुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात सामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं प्रभावित जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालं आहे. लोकांसह मोठ्या संख्येने पशुधन देखील मृत्युमुखी पडले आहे. (Afghanistan Floods )
1800 कुटुंबं प्रभावित (Afghanistan Floods) :
अफगाणिस्तानच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या मते, देशातील पुरामुळं सुमारे 1800 कुटुंबं प्रभावित झाली आहेत. या आपत्तीमुळं आधीच असुरक्षित शहरी आणि ग्रामीण समुदायांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुरामुळं सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांचं मूल्यांकन करण्यासाठी पथकं पाठवण्यात आली आहेत. लोकांच्या गरजांचं मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण देखील केले जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी असेही म्हटलं आहे की अफगाणिस्तानमध्ये हंगामातील पहिल्या मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळं देशातील दीर्घकाळापासून सुरु असलेला दुष्काळ संपला आहे.











