नवी दिल्ली : बेंगळुरुहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका प्रवाशानं कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं विमानात गोंधळ उडाला. प्रवाशानं योग्य पासकोड देखील प्रविष्ट केला, परंतु अपहरणाच्या भीतीनं कॅप्टननं कॉकपिटचा दरवाजा उघडला नाही. वृत्तानुसार, ज्या व्यक्तीनं हा प्रयत्न केला तो आठ साथीदारांसह प्रवास करत होता. सर्व नऊ प्रवाशांना सीआयएसएफकडे सोपवण्यात आलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान IX-1086 सोमवारी सकाळी 8 वाजता बेंगळुरुहून वाराणसीला रवाना झाले.
एअर इंडियानं काय सांगितलं :
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानात शौचालय शोधत असताना कॉकपिटच्या प्रवेशद्वारात एका प्रवाशानं प्रवेश केल्याच्या घटनेबद्दल आम्हाला मीडिया रिपोर्टची माहिती आहे. आम्ही पुष्टी करतो की पुरेसे सुरक्षा उपाय योजले गेले आहेत आणि त्यांच्याशी तडजोड केलेली नाही. लँडिंगच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती आणि सध्या चौकशी सुरु आहे.”
सुरक्षा प्रोटोकॉल मजबूत :
विमानात घडलेल्या घटनांबाबत एअर इंडिया एक्सप्रेसनं जोर दिला की त्यांचे मजबूत सुरक्षा प्रोटोकॉल “तडजोड केलेले नाहीत”. विमान उतरताना संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि चौकशी सुरु आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या सूत्रांनी सांगितलं की, प्रवाशाला आता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे आणि त्याच्या विमानातील घटनेसाठी त्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं.