दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी यूएसए (अमेरिका) क्रिकेटचं सदस्यत्व तात्काळ प्रभावानं निलंबित करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षभरातील बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर आणि प्रमुख भागधारकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे.
ऑलिंपिकची तयारी करण्याची परवानगी :
एका माध्यम निवेदनात, आयसीसीनं यूएसए क्रिकेटवर आयसीसी सदस्य म्हणून त्याच्या दायित्वांचं वारंवार आणि सतत उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकद्वारे क्रिकेट ऑलिंपिक कॅलेंडरमध्ये परत येण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु आयसीसीनं अमेरिकेच्या राष्ट्रीय संघांना त्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची आणि भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याची परवानगी दिली आहे.
आयसीसीनं आपल्या निवेदनात काय म्हटलं? :
आयसीसीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “आयसीसी बोर्डानं त्यांच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय आयसीसी संविधानानुसार आयसीसी सदस्य म्हणून यूएसए क्रिकेटनं केलेल्या दायित्वांचं वारंवार आणि सतत उल्लंघन केल्यावर आधारित आहे. यात कार्यात्मक प्रशासन संरचना लागू करण्यात अपयश, युनायटेड स्टेट्स ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक समिती (USOPC) सोबत राष्ट्रीय प्रशासकीय मंडळाचा दर्जा मिळविण्याच्या दिशेनं प्रगतीचा अभाव तसंच युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील क्रिकेटच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या महत्त्वपूर्ण कृतींचा समावेश आहे”
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा केला होता पराभव :
अमेरिकन क्रिकेट संघानं 2024 च्या टी-20 विश्वचषकात भाग घेतला. यूएसए क्रिकेट संघानं मेगा आयसीसी स्पर्धेत महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला, सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला हरवून त्यांनी मोठा अपसेट केला. अमेरिकन संघात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू देखील आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला बाद करुन मुंबईकर 33 वर्षीय वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर चांगलाच चर्चेत आला होता.