Indonesia floods and landslides : इंडोनेशियाच्या सुमात्रा प्रदेशात मुसळधार पावसानं कहर केला आहे. तासन्तास सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं नद्या दुथडी भरुन वाहत आहेत आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. या आपत्तीनं उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा आणि आचे या तीन प्रांतांना तडाखा दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे (BNPB) प्रमुख सुहार्यांतो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 250 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि अनेक शहरांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
उत्तर सुमात्रामध्ये सर्वाधिक जीवितहानी :
अहवालांनुसार, उत्तर सुमात्रा सर्वात जास्त प्रभावित झाला आहे, 166 मृत्यू आणि 143 बेपत्ता आहेत. पश्चिम सुमात्रा इथं 90 मृत्यू आणि 85 बेपत्ता आहेत. आचे इथं 47 मृत्यू आणि 51 बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की मुसळधार पावसानंतर, नद्या अचानक भरून आल्या आणि अनेक गावं इतकी पूर्णपणे बुडाली की ती नकाशावरुन गायब झाली. मुख्य रस्ते आणि पूल कोसळल्यानं मदत आणि बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक भागात जड यंत्रसामग्री पोहोचणे देखील कठीण झाले आहे. सैन्य आणि बचाव कर्मचारी लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर करत आहेत.
हे ही वाचा : कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
मदत कार्याला गती देण्याच्या सूचना :
राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी बाधित भागांचं हवाई सर्वेक्षण केलं आणि अधिकाऱ्यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, सरकारनं आंतरराष्ट्रीय मदत स्वीकारली आहे. अनेक देशांनी तात्काळ मदत साहित्य आणि बचाव पथकं पाठवण्याची ऑफर दिली आहे. हवामान सुधारल्यानंतर मदत कार्याची गती आणखी वाढली आहे असं बीएनपीबी प्रमुखांनी सांगितले. एजन्सी सध्या तीन आवश्यक पायऱ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे; पहिलं, बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी शोध आणि बचाव कार्य; दुसरं, विस्कळीत संपर्क नेटवर्क पुनर्संचयित करणं; आणि तिसरं, बाधित लोकांना आवश्यक साहित्य आणि मदत त्वरित पोहोचवणं.
त्यांनी सांगितलं की अधिकारी सतत मदत आणि बचाव मोहिमेत गुंतलेले आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं अनेक भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, ज्यामुळं मदत पोहोचवणं कठीण झालं आहे. पुरामुळं हजारो लोकांना घरे सोडून जावं लागलं आहे आणि ते सध्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहत आहेत. परिस्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी यासाठी एजन्सी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.












