काही समाजकंटकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना लंडन येथील टाव्हस्टॉक स्क्वेअर येथे सोमवारी घडली. विशेष म्हणजे, गांधी जयंतीच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे भारतीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भारताच्या उच्चयुक्तालयाने या प्रकारानंतर कडक शब्दात आपला निषेध नोंदवला असून ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं.
याबाबत, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने ट्विट केलं असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, कि ‘या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी घटना स्थळी पोहचले आणि ते पुतळा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’
महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधलं जातं. लंडनमध्ये त्यांचा ध्यानाला बसलेल्या मुद्रेतील पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याची काही भारत विरोधी समाज कंटकांनी विटंबना केली असून यानंतर भारतीय उच्चायुक्तालयानं ही एक लाजीरवाणी घटना आहे असं सांगितलं. तसेच,’हा फक्त पुतळा विद्रूप करण्याचा प्रकार नाहीये, तर अहिंसेच्या विचारधारेवर केलेला हिंसक हल्ला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या आधी दोन दिवस झाला आहे. हा हल्ला महात्मा गांधी यांच्या वारशावर करण्यात आला आहे. आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक प्रशासनाला याबाबत त्वरित कारवाई करण्यास सांगितलं आहे. आमची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आम्ही प्रशासनाला पुतळा पूर्वस्थितीत आणण्यासाठी मदत करत आहोत.’ असं देखील उच्चायुक्तालयानं सांगितलं.दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे, असं सांगण्यात आले आहे.
गांधी जयंती ही जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केली जाते. यावेळी लंडनमधील या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधीजींचे आवडत्या भजन गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. लंडनमधील हा पुतळा ब्रॉन्झचा असून हा पुतळा फ्रीडा ब्रिलियंट यांनी तयार केला आहे. या पुतळ्याचं अनावरण हे १९६८ मध्ये गांधी जयंतीला करण्यात आलं होते. महात्मा गांधी हे युनिव्हरसिटी कॉलेज ऑफ लंडनचे कायद्याचे विद्यार्थी होते.