पोझा रिका : गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळं मेक्सिकोमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशात मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आणि भूस्खलन झालं आहे. सततच्या पावसामुळं आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळं मेक्सिकोमध्ये किमान 41 जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालांनुसार, मेक्सिकन राज्यात व्हेराक्रूझमध्ये 6 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अंदाजे 540 मिलीमीटर (21 इंचांहून अधिक) पाऊस पडला. मेक्सिको सिटीच्या ईशान्येस 170 मैल (275 किलोमीटर) अंतरावर असलेल्या तेल शहर पोझा रिकामध्ये पूर येण्यापूर्वी कोणताही विशिष्ट इशारा देण्यात आला नव्हता.
अनेक भागात पुराचा परिणाम :
मेक्सिकोच्या राष्ट्रीय नागरी संरक्षण समन्वयानं अहवाल दिला आहे की शनिवारी मेक्सिको सिटीच्या उत्तरेस असलेल्या हिडाल्गो राज्यात मुसळधार पावसामुळं 16 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 150 समुदायांना वीजपुरवठा खंडित झाला आहे. मेक्सिको सिटीच्या पूर्वेस असलेल्या पुएब्ला राज्यात, किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 16,000 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे किंवा ते उद्ध्वस्त झाले आहे. याव्यतिरिक्त, व्हेराक्रूझ राज्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, जिथं भूस्खलन आणि पुरामुळे विस्कळीत झालेल्या 42 समुदायांमधील रहिवाशांना मदत करण्यासाठी सैन्य आणि नौदल मदत करत आहेत.
पुरामुळं लाखो लोक बाधित :
अधिकाऱ्यांनी सांगितलं की बचाव कर्मचारी संपूर्ण प्रदेशात 27 बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. आखाती किनाऱ्यावर असलेल्या व्हेराक्रूझ राज्यातील 55 नगरपालिकांमध्ये 16000 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. यापूर्वी, मध्यवर्ती राज्यात क्वेरेटारो इथं झालेल्या भूस्खलनात एका मुलाचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुसळधार पावसामुळं देशभरात 320,000 हून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाचं कारण मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या प्रिसिला आणि रेमंड या उष्णकटिबंधीय वादळांना जबाबदार धरलं आहे.