नवी दिल्ली : मेटल-ऑर्गनिक फ्रेमवर्क्स (MOFs)च्या विकासावरील त्यांच्या कार्यासाठी सुसुमु किटागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (अमेरिका) यांना रसायनशास्त्रातील या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या तंत्रज्ञानानं ऊर्जा साठवण, कार्बन कॅप्चर आणि औषध निर्मितीमध्ये क्रांती घडवली आहे. यापूर्वी, 2024 मध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हस्साबिस आणि जॉन जंपर यांना प्रोटीन डिझाइन आणि डीकोडिंगसाठी AI-आधारित तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला होता.
मेटल ऑर्गनिक फ्रेमवर्क्समध्ये महत्वपूर्ण काम :
सुसुमु किटागावा, रिचर्ड रॉब्सन आणि ओमर एम. याघी यांनी मेटल-ऑर्गनिक फ्रेमवर्क्सच्या (Development of Metal Organic Frameworks) क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. MOFs ही अशी संरचना आहे, जी धातू आयन आणि सेंद्रिय रेणूंनी बनलेली असते. ही संरचना अत्यंत छिद्रयुक्त आणि लवचिक असते. या संरचनेचा उपयोग गॅस साठवण, कार्बन डायऑक्साइड कॅप्चर आणि रासायनिक प्रक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून केला जातो. याघी यांनी या क्षेत्रात पायाभूत संशोधन केलं, तर किटागावा आणि रॉब्सन यांनी त्याला अधिक प्रगत केलं. त्यांच्या संशोधनामुळं पर्यावरण आणि औद्योगिक क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत.
संशोधन पुरस्काराचं बक्षिस :
नोबेल पारितोषिकाच्या प्रतिष्ठेव्यतिरिक्त, 11 दशलक्ष स्वीडिश क्राउन रक्कम भारतीय किंमत सुमारे 10 कोटी रुपये तिन्ही रसायनशास्त्रज्ञांना मिळणार आहेत. जपानच्या क्योटो विद्यापीठातून हायड्रोकार्बन रसायनशास्त्रात पीएचडी करणारे किटागावा यांनी यापूर्वी हम्बोल्ट संशोधन पुरस्कार (2008) आणि डी जेनेस पुरस्कार असे पुरस्कार जिंकले आहेत. ते सध्या क्योटो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दुसरीकडे यूकेमध्ये जन्मलेले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेले रॉबसन आता मेलबर्न विद्यापीठात विद्यार्थ्यांना धडे देण्याचं काम करताय. या व्यतिरिक्त ओमर एम. यागी यागी यांचा जन्म जॉर्डनमधील अम्मान मध्ये झाला होता. त्यांनी अमेरिकेतील इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली असून ते अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकवत प्राध्यापक म्हणून काम करताय.
याआधी, 2024 मध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हस्साबिस आणि जॉन जंपर यांना प्रोटीनच्या रचनेचा अभ्यास आणि नवीन प्रोटीन डिझाइन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केल्याबद्दल नोबेल मिळालं होतं. त्यांच्या संशोधनानं औषध निर्मिती आणि सामग्री विज्ञानात क्रांती घडवली आहे. बेकर यांनी प्रोटीन डिझाइनसाठी नवीन पद्धती विकसित केल्या, तर हस्साबिस आणि जंपर यांनी Google DeepMind इथं AI-आधारित अल्फाफोल्ड तंत्रज्ञान विकसित केलं होतं.