इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूख्वा प्रांताच्या तिराह खोऱ्यात कथित स्फोट होऊन 24 जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार पाकिस्तानमधील अशांत भाग म्हणून ओळख असलेल्या उत्तर-पश्चिममध्ये पाकिस्तानी तालिबानींकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य ठेवले होते. या साहित्याचा स्फोट होऊन दहशतवाद्यांसह किमान 24 लोकांचा मृत्यू झाला. मात्र, पाकिस्तानच्या विरोधी पक्षानं पाकिस्तानच्या सुरक्षादलाकडून हवाई हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिरह खोऱ्यात शक्तीशाली स्फोट झाला. जवळपासची अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. स्थानिक पोलीस अधिकारी जफर खान यांनी सांगितलं की, महिला आणि मुलांसह किमान 10 नागरिक ठार झाले आहेत. तर किमान 14 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.
दहशतवाद्यांनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप : दोन स्थानिक पाकिस्तानी तालिबानी कमांडर, अमन गुल आणि मसूद खान यांनी या कंपाउंडमध्ये तळ उभारला होता. त्याचा वापर रस्त्याच्या कडेला बॉम्बचा कारखाना म्हणून करण्यात येत होता. दहशतवाद्यांनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अलीकडेच इतर जिल्ह्यांतील प्रार्थनास्थळामध्ये शस्त्रे साठवल्याचे प्रकार समोर आले होते.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ :
पाकिस्तानी सुरक्षा दल खैबर, बाजौर आणि वायव्येकडील इतर भागांमध्ये पाकिस्तानी तालिबानविरुद्ध जोरदार कारवाई सुरू आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी बहुतेक हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी तालिबाननं घेतली आहे. या संघटनेचा थेट अफगाण तालिबानशी संबंध आहे. 2021 मध्ये अफगाण तालिबान सत्तेत परतल्यानंतर टीटीपी संघटनेचं मनोबल वाढलं आहे. अनेक टीटीपी नेते आणि लढवय्यांनी अफगाणिस्तानात आश्रय घेतल्याचं मानलं जातं आहे.
पाकिस्तान सरकारचं मौन :
पाकिस्तानचा विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) अनेक नेत्यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या (पीएएफ) विमानांनी बॉम्बहल्ला केल्याचा आरोप केला आहे. हवाई हल्ल्याचा निषेध करताना पीटीआयचे खासदार अब्दुल गनी यांनी अशा हवाई हल्ल्याचे परिणाम विनाशकारी असल्याचं म्हटलं आहे. कथित बॉम्बस्फोटाबाबत पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणतीही पुष्टी किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
तालिबानी राजवटीचं अमेरिकेबरोबरील संबंध बिघडले :
उल्लेखनीय बाब म्हणजे, अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारचा अमेरिकेच्या हवाई अड्ड्यावर ताबा आहे. हा हवाई अड्डा ताब्या देण्याचं आवाहन केल्यानंत तालिबान सरकारनं अमेरिकेचा मागणी फेटाळून लावली आहे. अफगाणिस्तान हा स्वतंत्र देश असल्याचं म्हणत त्यांच्या देशातील अमेरिकेचा हवाई अड्डा देण्यास तालिबान सरकारनं नकार दिला आहे. या घडामोडीनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटाबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहे.