अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा गोंधळ उडवून देणारा निर्णय घेतला आहे. ‘लिबरेशन डे’च्या दिवशी ट्रम्प यांनी सर्व देशांवरील परस्पर शुल्क (reciprocal tariffs) तात्पुरते ९० दिवसांसाठी स्थगित केले. मात्र, चीनसाठी त्यांनी वेगळीच भूमिका घेत, सर्व चिनी वस्तूंवर तब्बल १२५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध अधिक तीव्र झाले आहे. ट्रम्प यांच्या या कारवाईनंतर चीननेही प्रतिक्रिया देताना ८४ टक्क्यांचे प्रत्युत्तर शुल्क अमेरिकन वस्तूंवर लावले आहे. त्यामुळे या दोन आर्थिक महासत्तांमधील तणाव अधिक गडद झाला आहे. व्हाईट हाऊसने या संदर्भात अधिकृत वक्तव्य देताना इतर देशांना सावध करत म्हटले आहे की, “प्रतिकार करू नका, तुम्हाला बक्षीस दिलं जाईल.” याचा अर्थ असा की, जे देश ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात कारवाई करणार नाहीत, त्यांना भविष्यात व्यापार सवलती किंवा फायदे दिले जातील. या निर्णयामुळे अमेरिका आणि चीनमधील आधीच असलेले व्यापार आणि आर्थिक मतभेद अधिक तीव्र होत आहेत. चीनने अमेरिकन निर्यातींवर शुल्क वाढवल्यामुळे दोन्ही देशांमधील निर्यात-आयात व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे.












