मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधांचा एक नवा अध्याय सुरु होणार आहे. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर आपला पदभार ग्रहण केल्यानंतर प्रथमच भारत भेटीवर आले आहेत. आज बुधवारी (8 ऑक्टोबर) पहाटे मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन झालं. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता मुंबईत त्यांचं स्वागत करतील. या भेटीदरम्यान दोन्ही नेते भारत-ब्रिटन भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी ‘व्हिजन-2035’ वर सविस्तर चर्चा करतील. त्यानंतर पुढील रूपरेषा निश्चित करतील.
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन :
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचं आज सकाळी 5:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. या सोबतच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनीही कीअर स्टार्मर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
राजभवनात मोदी-स्टार्मर भेट : युनायटेड किंगडमचे पंतप्रधान स्टार्मर 8 व 9 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पहिल्या अधिकृत दोन दिवसीय भारत दौर्यावर आहेत. गुरुवारी सकाळी मुंबईतील राजभवनात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते माध्यमांशी संवाद साधतील. मुंबईत होणाऱ्या बैठकीत ‘व्हिजन 2035’ यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सुमारे 1:45 वाजता स्टार्मर यांच्यासोबत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित सीईओ फोरममध्ये सहभागी होतील. त्यानंतर सुमारे 2:45 वाजता दोन्ही नेते सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) मध्ये सहभागी होऊन भाषणं करतील.
यु के मधून एक मोठं शिष्टमंडळ भारतात :
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या भारत दौर्यात ‘समग्र आर्थिक व व्यापार करार’ (CETA) हा मुख्य अजेंडा असणार आहे. पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांच्यात होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेचा केंद्रबिंदू हाच करार असेल. या कराराला ब्रिटिश संसदेकडून मान्यता मिळाल्यानंतर भारत आणि ब्रिटनमधील 90 टक्क्यांहून अधिक वस्तूंवर लावले जाणारे सीमा शुल्क हटवले जाण्याचा मार्ग मोकळा होईल. या दौर्यात सर स्टार्मर यांच्यासोबत 100 हून अधिक सदस्यांचं एक भव्य प्रतिनिधिमंडळ भारतात आलं आहे. या प्रतिनिधिमंडळात उद्योगविश्वातील आघाडीचे उद्योजक, विविध नामांकित विद्यापीठांचे कुलगुरू तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर :
युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्यांच्या सोबत येणारं शिष्टमंडळ व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि तांत्रिक सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. या प्रतिनिधिमंडळात ब्रिटनमधील आघाडीची तेल कंपनी बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मरे ऑकिनक्लॉस यांचा देखील समावेश आहे.
तंत्रज्ञान आणि फिनटेकवर विशेष भर :
कीअर स्टार्मर आणि नरेंद्र मोदी दोघेही मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रमुख भाषण देतील. या भाषणात गेल्या वर्षी करार करण्यात आलेल्या भारत-यूके तंत्रज्ञान सुरक्षा पुढाकार (TSI) वरही प्रकाश टाकला जाईल. TSI चे मुख्य उद्दिष्ट टेलिकॉम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवणं आहे.