नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारतात कफ सिरप खाल्ल्यानं होणाऱ्या मृत्यूंची दखल घेतली आहे. मुलांच्या मृत्यूंशी कफ सिरप किती देशांमध्ये जोडलं गेलं आहे हे WHO नं विचारले आहे. WHO च्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की भारताकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर, या कफ सिरपबाबत जागतिक अलर्ट जारी केला जाईल. आजपर्यंत WHO नं खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कोल्ड्रिफ सिरप’बाबत कोणताही इशारा किंवा अलर्ट जारी केलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली चिंता :
भारतात कफ सिरपमुळं होणाऱ्या मृत्यूंबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. या दुःखद घटनांचं गांभीर्य त्यांना समजतं आणि ते तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. WHO नं म्हटलं आहे की भारतात औषधासाठी आवश्यक चाचणीचा अभाव आहे. दरम्यान, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) नं पुष्टी केली आहे की हे उत्पादन इतर कोणत्याही देशात निर्यात केलं गेलं नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनं विचारले प्रश्न :
भारतात मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांचं निरीक्षण कसं केलं जातं हे जागतिक आरोग्य संघटनेनं विचारलं आहे. WHO नं माहिती मागणारा भारत सरकारला ईमेल पाठवला आहे.
– भारत हा कफ सिरपचा अग्रगण्य निर्यातदार असल्यानं, निर्यातीपूर्वी आणि नंतर त्याच्याकडे एक मजबूत गुणवत्ता तपासणी प्रणाली आहे का?
– मध्य प्रदेशातील घटना रोखण्यासाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत?
– भारताची फार्माकोविजिलन्स प्रणाली (औषध देखरेख प्रणाली) किती प्रभावी आहे?
– 1937 मध्ये अमेरिकेनं चालवलेल्या मोहिमेप्रमाणेच भारतानं दूषित औषधांसाठी सार्वजनिक रिकॉल मोहीम सुरु केली आहे का?
कफ सिरपमध्ये DEG ओळखणं सोपं नाही :
जागतिक आरोग्य संघटनेनं एका ईमेलमध्ये स्पष्ट केलं की कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) ओळखणं सोपं नाही आणि त्याची पुष्टी करण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. हे रसायन सामान्यतः अँटी-फ्रीझ एजंट म्हणून वापरलं जातं, परंतु जेव्हा ते औषधांमध्ये जातं तेव्हा ते मूत्रपिंड निकामी होणं, अर्धांगवायू आणि मृत्यू देखील होऊ शकते. गांबियामध्ये झालेल्या मृत्यूंनंतर सहा महिन्यांनी DEG ची पुष्टी झाली.
कंपनी मालकाला अटक :
दरम्यान माध्यमांच्या वृत्तानुसार, सिरप खाल्ल्यानंतर 20 मुलांचा मृत्यू झाला आहे. केरळ आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी सिरपवर बंदी घातली आहे. दरम्यान, कफ सिरपमुळं झालेल्या मुलांच्या मृत्यूप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि कोल्ड्रिफ हे विषारी औषध बनवणारी कंपनी श्रीसन फार्माच्या मालकाला अटक केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं (SIT) चेन्नईमध्ये रंगनाथनला अटक केली.