एका विवाहित महिलेला तिच्या सहा वर्षाच्या लेकासमोर जाळून मारून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात मृत विवाहितेच्या पतीला आणि सासरच्या माणसांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. ग्रेटर नोएडातील कसना पोलीस स्टेशन परिसरातील सिरसा गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत, मृत महिलेच्या बहिणीने सासरच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामध्ये विवाहित महिलेला जाळल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ग्रेटर नोएडातील सिरसा गावात विवाहित महिलेची तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी हत्या केल्याची घटना घडली. यावेळी पती सोबत सासुचाही समावेश होता. आधी त्याने पत्नीला मारहाण केली आणि नंतर ज्वलनशील पदार्थ पत्नीच्या अंगावर टाकून तिला जाळले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बहिणीसमोरच हा सगळा प्रकार घडला असून तिने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिलाही मारहाण करण्यात आली, शेवटी डोळ्यासमोर बहिणीचा जीव गेला असं सांगत मृत महिलेच्या बहिणीने हंबरडा फोडला.
रुपबास गावातील रहिवासी भिकारी सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मुली कांचन आणि निक्की यांचे लग्न डिसेंबर 2016 मध्ये सिरसा गावातील रोहित आणि विपिन यांच्याशी हुंडा न घेता झाले होते. लग्नात स्कॉर्पिओ कार आणि इतर वस्तू देण्यात आल्या. पण तरीही, लग्नानंतर लगेच सासरच्यांनी हुंडा म्हणून 35 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान, त्यांना आणखी एक कार देण्यात आली, परंतु त्यानंतरही सासरच्या मागण्या कमी झाल्या नाहीत. सासरचे लोक त्यांच्या दोन्ही मुलींना मारहाण करायचे. खूपदा दोन्ही कुटुंबातील लोकांनी समजावून सांगितले तरी सासरच्या लोकांची पैशाची हाव कमी झाली नाही. याच पैशाच्या हावेपोटी सासरच्यांनी निष्पाप निक्कीचा जीव घेतला. पतीने तिला जाळून टाकले आणि जेव्हा सासरा आणि दीर घरी आले, त्यांनी हा प्रकार बघितला आणि तातडीने निक्कीला खासगी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तिचा दुदैवी मृत्यू झाला होता.
आईला डोळ्यासमोर जाळताना बघून सहा वर्षाचा मुलगा ही घाबरला होता. या घटनेसोबत दुसरा अजून एक व्हिडिओ वायरल झाला ज्यात तो मुलगा ‘ पप्पानेच आईला लायटरने जाळले’ असं रडून सांगत होता. या संबंधित घटनेची चौकशी सुरु असून पती विपीनला पोलिसांनी अटक केली होती, परंतु त्याने पळायचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी त्याला पायावर गोळी मारून पकडले. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबात एकच शोक पसरला असून आईच्या मृत्यूमुळे तिचा मुलगा खूप रडत आहे.
देश प्रगती करत पुढे जात आहे मात्र हुंड्यासाठी निष्पाप महिलेचा जीव अजून जात आहे. पैशाची हाव सुखी संसार उध्वस्थ करू शकते यांचं भयावह उदाहरण म्हणजे निक्की आणि विपीन………
प्रीती हिंगणे ( लेखिका )