सातारा जिल्ह्यातील कासपठार आणि प्रतापगड यांना जागतिक वारसा स्थळांच्या मिळालेल्या दर्जानंतर आता साताऱ्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांना युनोस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले असून संपूर्ण राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. यामुळे साताऱ्यातील पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. साताऱ्यामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन आणि निसर्गरम्य ठिकाणांमुळे यांचा जगभर बोलबाला आहे.
युनेस्कोच्या या मान्यतेमुळे या परिसराच्या संरक्षणासाठी अधिक संसाधने उपलब्ध होणार आहेत. स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणीय संस्थांनी या परिसराच्या संवर्धनासाठी संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीच्या युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशामुळे या परिसराच्या महत्त्वात वाढ झाली आहे. या निर्णयामुळे या परिसराच्या जैवविविधता, भूगर्भीय महत्त्व आणि पर्यावरणीय संवर्धनाला जागतिक मान्यता मिळाली आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी हे पश्चिम घाटातील लाव्हा प्रवाहांमुळे या भागात ‘फ्लड बॅसॉल्ट’ या प्रकाराच्या रचनाचा अभ्यास केला जातो, जो पृथ्वीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटक आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीचा परिसर 1985 मध्ये कोयना अभयारण्याचा भाग म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यानंतर 2001 मध्ये या भागाला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. यामुळे या परिसरात कृषी आणि पर्यटनाच्या वाढत्या पर्यटनामुळे पर्यावरणीय तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
साताऱ्यातील पर्यटन स्थळाचे आकर्षण कोणते?
महाबळेश्वर आणि पाचगणी हे पश्चिम घाटातील भाग असून, जैवविविधतेचा खजिना म्हणून याला ओळख असून या परिसरात 850 हून अधिक वनस्पती प्रजाती, दुर्मिळ पक्षी आणि प्राणी आढळतात. तसेच, बॉम्बे नाइट फ्रॉग’, ‘मालबार ट्री टोड’, ‘कोयना टोड’, ‘इंडियन व्हल्चर’ यांसारख्या संकटग्रस्त प्रजाती येथे आढळतात. कास पठार, ज्याला ‘फुलांचा पठार’ म्हणून ओळखले जाते, हे या परिसराचे एक प्रमुख आकर्षण आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असून या परिसरात ‘डेक्कन ट्रॅप्स’ नावाच्या ज्वालामुखीय खडकांचा समावेश आहे, ज्यामुळे या भागाला भूगर्भीय दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. या खडकांच्या रचनेमुळे या परिसराला जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळाले आहे.
त्यातच जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणे हे केवळ या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचेच नव्हे, तर त्याच्या जैवविविधतेचे आणि भूगर्भीय महत्त्वाचेही प्रतीक आहे. या मान्यतेमुळे या परिसराच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसराचा जागतिक पातळीवर विकास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक समुदायांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास होईल.