महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर परिसरात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. गेल्या आठवडाभरात 2 ते 3 घटना उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर परिसरात 45 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. महसूल अधिकाऱ्याकडून झालेला अपमान आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या 45 वर्षीय मृत शेतकऱ्याचे नाव संजय कोहकडे असून त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
४५ वर्षीय शेतकरी संजय कोहकडे यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामुळें पूर येत असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर शेताची पाहणी करत असताना महसूल अधिकाऱ्याकडून या शेतकऱ्याचा अपमान करण्यात आला. आणि त्याला शिवीगाळ देखील करण्यात आली. त्यामुळे शेताची पाहणी करत असतानाच त्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवले.
मृत संजय कोहकडे यांच्या नातेवाईकांनी महसूल कर्मचारी आणि शेजारच्या शेतकऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली असून पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देईपर्यंत त्यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयाबाहेर अनेक तास धरणे आंदोलन करत शवविच्छेदन करण्यास परवानगी देण्यास नकार दिला.
याच आठवड्यात आणखी एका शेतकऱ्याने केली आत्महत्या
छत्रपती संभजीनगर येथील पैठणच्या रजापूर येथे शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सोनू मोहन गोर्डे असे आत्महत्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी सोनू मोहन गोर्डे यांची आडूळ शिवारात अडीच एकर शेती होती, या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतातील पिकाच्या नापिकीमुळे आणि हवा तसा उत्पन्न मिळत नसल्याने ते मागील बऱ्याच दिवसांपासून कंटाळले होते. अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन आडूळ शिवरात एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला तर घटनास्थळी विषारी औषधाची बाटली आढळून आली.